आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये २७ वर्षांनंतर "रुपया' नोटेचे उत्पादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - देशात चलनात सर्वाधिक उपयोगात येणाऱ्या एक रुपयाच्या नोटेचे करन्सी नोटप्रेसमध्ये सन १९८८ मध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू होते. दरम्यानच्या काळात रुपयाच्या नोटेचे उत्पादन बंद करण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी अर्थमंत्रालयाने एक रुपयाच्या नोटेच्या उत्पादनाचा निर्णय घेऊन प्रेसकडे मागणी नोंदवली. २७ वर्षांनंतर संधी मिळताच करन्सीच्या कामगारांनी युद्धपातळीवर एक रुपयांच्या पाच मिलियन नोटांचे अवघ्या महिनाभराच्या आत वेळेपूर्वी नोटांचे उत्पादन पूर्ण केले.
भारत सरकारने देशातील अर्थमंत्रालय व रिझर्व्ह बँकेच्या प्रत्येक प्रेसला पर्याय उभा केला. मात्र, आयएसपी प्रेसला पर्याय उभा राहू शकला नाही. कुशल मेहनती व कोणत्याही स्पर्धेला सामोरे जाण्याची जिद्द बाळगणाऱ्या कामगारांनी आपली मक्तेदारी सिद्ध करत आर्थिक वर्षात तब्बल दोनशे कोटी रुपयांचा नफा कमवला आहे. पासपोर्ट छपाईत मोनोपॉली असलेल्या आयएसपीने वर्षात एक कोटी सहा लाख पासपोर्टचे उत्पादन केल्याने परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रेसकडे सन २०१५-१६ वर्षासाठी दीड कोटी पासपोर्ट उत्पादनाची मागणी नोंदवली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील पासपोर्टच्या धर्तीवर भारत सरकारने ई-पासपोर्ट छपाईचा निर्णय घेतला असून, आयएसपीने तयार केलेल्या आराखड्यास परराष्ट्र मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. कच्चा माल उपलब्ध झाल्यानंतर उत्पादनास सुरुवात होणार आहे. सुरुवातीला अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच इ-पासपोर्ट वितरित केला जाणार आहे.

इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये सर्व प्रकारचे स्टॅम्प, पासपोर्ट, पोस्टाचे स्टॅम्प, सरकारच्या महत्त्वाच्या दस्तऐवजाचे उत्पादन होते. प्रेसचे महामंडळात रूपांतर झाल्यानंतर प्रेसने उत्पादनात लक्षणीय वाढ केल्याने आर्थिक वर्षात देशातील नऊ प्रेसमध्ये आयएसपीने सर्वाधिक उत्पादनाबरोबरच विक्रमी दोनशे कोटी रुपये नफा कमवण्यापर्यंत मजल मारली.
मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती

^आयएसपी, सीएनपीसह देशातील नऊ प्रेसचे महामंडळात रूपांतर झाल्यानंतर नाशिक युनिटच्या कामगारांनी ठरवून दिलेल्या वेळेपूर्वीच उत्पादनात सातत्य ठेवून देशात आदर्श निर्माण केला. येत्या काळात उत्पादनातील वाढीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. योग्य पद्धतीमुळे योग्य प्रकारे उत्पादन वाढले आहे. यामुळे वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांत आनंद पसरला आहे. जगदीश गोडसे, सरचिटणीस, आयएसपी मजदूर संघ
आयएसपी, सीएनपी देशात अव्वल

^इंडिया सिक्युरिटी प्रेस सीएनपी प्रेसने उत्पादन व नफ्यात अव्वल स्थान पटकावले आहे. आयएसपीने दोनशे कोटी रुपये नफा कमावला. सीएनपीने देशात बेस्ट प्रॉफिट प्रॉडक्शनचा सीएमडी चषक पटकावला आहे. नाशिक येथील दोन्ही प्रेसमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यास या दोन्ही प्रेसचा देशात कोणी हात धरू शकणार नाही, असा विश्वास वाटतो.
ज्ञानेश्वर जुंद्रे, कार्याध्यक्ष, आयएसपी मजदूर संघ
सीएनपीला सीएमडी चषक

संपूर्ण देशात असणाऱ्या सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन इंडिया या महामंडळातील नऊ कारखान्यांत बेस्ट प्रॉफिट प्रोडक्शनचा बहुमानाचा ‘सीएमडी चषक’ करन्सी नोट प्रेसने सलग दुसऱ्यांदा पटकावला. याअगोदही या कारखान्याने विविध उपक्रम योग्य पद्धतीने राबवून देशपातळीवरील विविध बक्षिसे मिळवली आहेत.

करन्सीची घोडदौड

करन्सी नोट प्रेसने देशातील नऊ प्रेसमध्ये आपली आगळी-वेगळी छाप पाडली आहे. आयएसपीपाठोपाठ सीएनपीने उत्पादन व नफ्यात आघाडी घेतली आहे. सीएनपीने यापूर्वीच शंभर कोटी नफ्याच्या विक्रमाची नोंद केली होती. या वर्षीही कामगारांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे व केलेल्या प्रयत्नामुळे उत्पादनात त्यापुढे योग्य पद्धतीने मजल मारली आहे.
कामगारांना श्रेय

सन २०१४-१५ वर्षात नाशिकच्या आयएसपीकडे नोंदवलेल्या मागणीनुसार आमच्या कामगारांनी प्रतिकूल परिस्थितीत एक कोटी सहा लाख पासपोर्टचे उत्पादन करून या क्षेत्रातील आपली मक्तेदारी पुन्हा एकदा सिद्ध केली. परराष्ट्र मंत्रालयाने सन २०१५-१६ वर्षासाठी प्रेसकडे दीड कोटी पासपोर्टच्या उत्पादनाची मागणी नोंदवली आहे.
पासपोर्टला मागणी

पर्यटन, नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त परदेशात जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने पासपोर्टला देशात सर्वाधिक मागणी आहे. नाशिकमध्ये महिन्याला सुमारे सहा हजार पासपोर्टची गरज पडत आहे. आयएसपीची पासपोर्ट उत्पादनात मक्तेदारी असली तरी इतर उत्पादनांत मोठी आघाडी घेत प्रेसने वर्षात २३ कोटी स्टॅम्पचे उत्पादन केले आहे. याशिवाय विविध राज्यांसाठी निवडणुकीच्या एव्हीएम मशीनचे सील, सरकारी दस्तऐवजांचे उत्पादन केले आहे.