आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान, चीनमधून १०,००० टन कांदा खरेदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीच्या किरकोळ बाजारात कांदा ४० रुपये प्रतिकिलोवर गेला आहे. सरकारच्या वतीने कांद्याच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बाजारात कांद्याची आवक वाढवण्यासाठी १०,००० टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कांदा पाकिस्तान, चीन आणि इजिप्त येथून आयात करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने साेमवारी दिली. तसेच देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारात देशभरातील कांद्याचे भाव निश्चित होतात. या महिन्याच्या सुरुवातीला लासलगाव बाजारात कांदा १५ रुपये किलोने विक्री झाला. सध्या याच बाजारात कांदा २५ रुपये प्रतिकिलोपर्यंत गेला आहे. म्हणजेच २७ दिवसांत कांद्याच्या किमती जवळपास ६७ टक्के वाढल्या आहेत. तर दिल्लीच्या घाऊक बाजारात गेल्या अाठवड्यात कांदा २० रुपये किलोने विक्री होत होता. आता तोच कांदा ३० रुपये किलोने विक्री होत आहे.

आझादपूर कांदा विक्रेता संघाचे अध्यक्ष सुरेंदर बुद्धिराजा यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात कांद्याच्या किमती १० रुपये प्रतिकिलो वाढल्या अाहेत. असे असले तरी कांद्याची आवक कमी झालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. मदर डेअरीवरील कांद्यावर ३८.९० रुपये किलोचा भाव मिळत आहे, तर पॅकिंगचा कांदादेखील ४० रुपये किलोच्या भावाने विक्री होत आहे.

मुबलक साठा उपलब्ध
नाशिकमधील नॅशनल हॉर्टिकल्चरल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन (एनएचआरडीएफ)चे अध्यक्ष आर. पी. गुप्त यांनी बाजारात कांद्याचा मुबलक साठा शिल्लक असल्याचे सांगितले आहे. सध्या देशात रब्बीचा हंगाम सुरू असून या हंगामातील २८ लाख टन कांदा शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. हा साठा दोन महिन्यांसाठीच्या मागणीच्या बरोबर आहे. याबरोबरच अांध्र प्रदेशात सुरुवातीलाच खरीप हंगामातील कांदा निघायला सुरुवात झाली आहे. यादरम्यान केंद्र सरकारच्या वतीने येणा-या महिन्यात १०,००० टन कांदा आयात करण्यासाठी निविदा काढल्या आहेत.

निर्यातमूल्य वाढवले
देशात वर्षाकाठी जवळपास १६५ लाख टन कांदा विक्री होतो, तर जवळपास १८० लाख टन कांद्याचे उत्पादन होते. कांद्याच्या भावात वाढ होण्याच्या शक्यतेमुळे सरकारने आधीच कांद्याचे निर्यातमूल्य (एमईपी) वाढवून तो ४२५ डॉलर प्रतिटन केला आहे. याव्यतिरिक्त कांद्यासह इतर आवश्यक वस्तूंच्या निर्धारित केलेल्या साठ्याव्यतिरिक्त अतिरिक्त साठा करण्यासाठीची बंदी वर्ष २०१६ पर्यंत वाढवली आहे.