आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला विकसित देशांप्रमाणे शिक्षण पातळी गाठण्यासाठी लागतील १२६ वर्षे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील शिक्षणावर सध्या होत असलेल्या खर्चाची गती कायम राहिल्यास आणि चांगल्या शिक्षकांच्या कमतरतेची समस्या अशीच राहिल्यास भारताला विकसित देशांप्रमाणे शिक्षण पातळी गाठण्यासाठी सहा पिढ्या किंवा १२६ वर्षे लागतील, असा दावा उद्योग संघटना असोचेमच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अहवालात करण्यात आला आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेत “प्रभावशाली’ बदल करण्याचे आवाहनदेखील या अहवालात करण्यात आले आहे.
भारताने शिक्षण क्षेत्रात तेजीने प्रगती केली असली तरी जोपर्यंत विकसित देशांप्रमाणे शिक्षणावरील खर्चात वाढ होत नाही तोपर्यंत शिक्षणाच्या पातळीमध्ये असलेली दरी भरून निघणार नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विकसित देशांनी शिक्षणावरील खर्चामध्ये अजूनही कपात केलेली नाही.
जीडीपीच्या ३.८३ टक्के खर्च : शिक्षण क्षेत्रावर भारतात सकल घरेलू उत्पादनाच्या (जीडीपी) फक्त ३.८३ टक्के खर्च होतो. ही रक्कम विकसित देशांची बरोबरी करण्यासाठी पुरेशी नसल्याचे मत यात मांडण्यात आले.
योग्य शिक्षकांची कमतरता
चांगल्या शिक्षकांची कमतरता हे शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे आव्हान आहे. सध्याच्या स्थितीतही १४ लाख शिक्षकांची कमतरता आहे. याव्यतिरिक्त २० टक्के शिक्षकांची योग्यता राष्ट्रीय शिक्षक योग्यता परिषदेच्या गुणांकनाप्रमाणे नाही.
प्राथमिक शिक्षण
प्राथमिक शिक्षणावर जीडीपीच्या १.५७ टक्के, तर माध्यमिक शिक्षणावर फक्त ०.९८ टक्के खर्च करण्यात येतो. उच्च आणि तांत्रिक शिक्षणावर यापेक्षाही कमी (०.८९% व ०.३३ %) खर्च करण्यात येतो.
देशात ३१ कोटी ५० लाख विद्यार्थी
भारतात शिक्षण क्षेत्रावरील खर्चात वाढ झाल्यास भारत जगासाठी प्रतिभेचे मोठे केंद्र बनेल. या वेळी देशात ३१ कोटी ५० लाख विद्यार्थी आहेत. जगातील ही सर्वात मोठी विद्यार्थी संख्या आहे.
बातम्या आणखी आहेत...