आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटीला ३२ पैकी ३० पक्षांचे समर्थन, संसदीय कार्यमंत्री एम. व्यंकय्या नायडूंचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारला संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक मंजूर करण्याची अपेक्षा आहे. या विधेयकाला मंजुरी देण्यासाठी ३२ पैकी ३० पक्षांनी समर्थन दिले असल्याचा दावा सरकारने केला आहे. सरकार या विधेयकावर काँग्रेसच्या प्रतिक्रियेची वाट पाहत असून काँग्रेसच्या सर्व शंका दूर करून त्यांना सोबत घेण्याची तयारी सरकार करत आहे. हे विधेयक पुढील आठवड्यात राज्यसभेत सादर होऊ शकते.

आम्ही जीएसटी मंजूर करण्याचा प्रयत्न करत असून सर्वसामान्य नागरिक देखील जवळपास सर्वच या बाजूचे असल्याचे मत संसदीय कार्यमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. बुधवारी सर्वपक्षीय बैठकीनंतर नायडू यांनी अर्थमंत्री अरुण जेटली, राज्यसभा आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि मल्लिकार्जुन खारगे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून उत्तर देण्यासाठी एक किंवा देान दिवसांचा अवधी मागितला आहे. यानंतर सरकारच्या वतीने काँग्रेसच्या शंकांचे निरसन करणार आहे.
सर्वपक्षीय बैठकीला आलेल्या ३२ पैकी ३० राजकीय पक्षांनी लवकरात लवकर हे विधेयक मंजूर करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचा दावा नायडू यांनी केला. बसप आणि राष्ट्रवादीने आधीच या विधेयकाला समर्थन जाहीर केले आहे. तसेच हिवाळी अधिवेशनातच ते मंजूर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न : काँग्रेसने देखील हे संविधान संशोधन विधेयक मंजूर करण्याच्या बाजूने यावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. तसे पाहिले तर हे विधेयक मूळ स्वरुपात काँग्रेसचेच आहे.
काँग्रेसच्या चिंतेचे कारण
कर सुधारणांच्या बाबतीत काँग्रेसने व्यक्त केलेल्या कारणांची संख्या आधीच सातवरून तीनवर आली आहे. यामध्ये जीएसटीचा दर जास्तीत जास्त १८ टक्के असायला हवा याचा देखील समावेश आहे. तसेच याचा उल्लेख या विधेयकात असायला हवा, असा एक मुद्दा आहे. तसेच राज्यांवर पडणारा बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने १०० टक्के भरपाई देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
विधेयकाला पाठिंबा
जीएसटी विधेयकाला आमचा पाठिंबा असून ते याच अधिवेशनात मंजूर झाले पाहिजे. या संदर्भात कोणतीही चांगली सूचना आल्यास सरकारने त्याचा समावेश करावा.
प्रफुल्ल पटेल, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस