Home | Business | Industries | walmart is set to announce the purchase of a majority stake in flipkart

भारतातील ई-कॉमर्स 2.2 लाख कोटींचे, वॉलमार्ट अन् अमेझॉनमध्ये पकड वाढवण्याची स्पर्धा

वृत्तसंस्था | Update - May 10, 2018, 07:41 AM IST

वॉलमार्टने फ्लिपकार्टची खरेदी केल्याने भारताच्या ई-कॉमर्स बाजारात दोन अमेरिकी कंपन्यांमध्ये सरळ-सरळ स्पर्धा होणार आहे. अ

 • walmart is set to announce the purchase of a majority stake in flipkart

  बंगळुरू - वॉलमार्टने फ्लिपकार्टची खरेदी केल्याने भारताच्या ई-कॉमर्स बाजारात दोन अमेरिकी कंपन्यांमध्ये सरळ-सरळ स्पर्धा होणार आहे. अमेरिकेमध्ये ऑनलाइन शॉपिंग वाढल्यामुळे तेथेही वॉलमार्टला अमेझॉन टक्कर देत आहे. दुसरीकडे अलीबाबामुळे अमेझॉनला चीनमध्ये मजबुतीने उभे राहण्याची संधी मिळताना दिसत नाही. त्यामुळे आता भारतात या दोन्ही कंपन्या समाेरासमोर असतील. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजो यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी भारतात ३३,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती.

  कंपनीने मार्केटप्लेस बिझनेसमध्ये आतापर्यंत सुमारे २०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. दुसरीकडे, फ्लिपकार्टमध्ये वॉलमार्टच्या गुंतवणुकीत १३,५०० कोटी रुपयांच्या नव्या फंडिंगचा समावेश आहे. यामुळे फ्लिपकार्टला सवलत देण्याच्या स्पर्धेत पुरेसा पैसा मिळणार आहे.


  २०१८ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार २०१६-१७ मध्ये भारतातील ई-कॉमर्स बाजाराची वाढ १९.१ टक्क्यांसह सुमारे २.२ लाख कोटी रुपये झाली होती. पूर्ण किरकोळ विक्री बाजार सुमारे ४७ लाख कोटी रुपयांचा आहे. म्हणजेच ई-कॉमर्स पूर्ण किरकोळ विक्री बाजाराच्या तुलनेत केवळ ४.५ टक्के आहे. २०२७ मध्ये रिटेल बाजार १२० लाख कोटी रुपयांचा होण्याची अपेक्षा आहे. यात ७३ लाख कोटी रुपयांचा सर्वात मोठा भाग हा किराणा आणि खाद्य पदार्थांच्या वस्तूंचा असेल. ई-कॉमर्स सामान्य रिटेलच्या तुलनेत चौपट जास्त तेजीने वाढण्याची वॉलमार्टला अपेक्षा आहे. भारतात सध्या सुमारे ४० कोटी इंटरनेट युजर आहेत. यातील केवळ १४ टक्के ऑनलाइन शॉपिंग करतात. त्यांच्या संख्येत तेजीने वाढ होण्याची शक्यता आहे.


  वॉलमार्टला अनेक वर्षांपासून भारताच्या रिटेल बाजारात येण्याची इच्छा होती. मात्र, भारतात मल्टिब्रँड रिटेलमध्ये एफडीआयची परवानगी नाही. मात्र, सिंगल ब्रँड रिटेलमध्ये १०० टक्के विदेशी गुंतवणूक करता येते. फ्लिपकार्टच्या खरेदीमुळे कंपनीचा हा बाजारातील अप्रत्यक्ष प्रवेश मानला जात आहे. फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सध्या ई-कॉमर्स मार्केटप्लेसच्या स्वरूपात बिझनेस करत आहे. यामध्ये १०० टक्के एफडीआयला परवानगी आहे.

  ऑनलाइन फॅशन बाजाराच्या ७०% भागावर फ्लिपकार्टचा ताबा
  ई-कॉमर्स बाजारामध्ये फ्लिपकार्टची सध्या सुमारे ४३% भागीदारी आहे. भारतात कंपनीला अमेझॉन टक्कर देईल, कारण या कंपनीची भागीदारी ३८% आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचच्या अहवालानुसार पुढील वर्षापर्यंत भारतातील फ्लिपकार्टची बाजारातील भागीदारी ४४% होण्याचा अंदाज आहे. फ्लिपकार्ट ग्रुपमध्ये मिंत्रा आणि जाबोंगचाही समावेश आहे. या तिन्हीला एकत्र केल्यास ७०% ऑनलाइन फॅशन बाजारावर फ्लिपकार्ट समूहाचाच ताबा आहे.

  > २००७ मध्ये फ्लिपकार्टची स्थापना, पहिल्या वर्षी केवळ २० आॅर्डर

  * ऑक्टोबर २००७ मध्ये सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी फ्लिपकार्टची स्थापना केली होती. दोन्ही बन्सल यांनी आयआयटी दिल्लीत शिक्षण घेतले आहे. दोघांनीही आधी अॅमेझॉनमध्ये काम केलेले आहे.

  * फ्लिपकार्टने अमेझॉनप्रमाणेच पुस्तकांची विक्री सुरू केली. पहिले पुस्तक जॉन वुड्स यांचे ‘लिव्हिंग मायक्रोसॉफ्ट टू चेंज द वर्ल्ड’ विकले होते. पहिल्याच वर्षी केवळ २० ऑर्डर मिळाल्या होत्या.

  * २००८ मध्ये बंगळुरूमध्ये पहिले आणि त्यानंतर २००९ मध्ये दिल्ली आणि मुंबईत कार्यालय सुरू केले.

  * २०१० मध्ये लॉजिस्टिक्स संस्था ई-कार्टची सुरुवात केली

  * २०१० मध्ये पहिल्यांदाच कॅश ऑन डिलिव्हरीची सुरुवात केली, त्यामुळे ग्राहकांच्या संख्येत तेजीने वाढ झाली.

  * २०११ मध्ये विदेशी गुंतवणूकदारांना अाकर्षित करण्यासाठी सिंगापूरमध्ये लिस्टिंग झाली.

  * २०१६ मध्ये कंपनीच्या नोंदणीकृत ग्राहकांची संख्या १० कोटींच्या वर गेली. त्याच वर्षी प्रतिष्ठित टाइम मॅगझिनने सचिन आणि बिन्नी बन्सल यांचा समावेश प्रभावी १०० लोकांमध्ये केला होता.

  फ्लिपकार्टला २०१७ मध्ये ८,७७० कोटी रु. तोटा

  * २०१६-१७ मध्ये फ्लिपकार्टचा एकूण महसूल २९% वाढून १९,८५५ कोटी रुपये झाला होता, तर तोटा ५,२१६ कोटी रुपयांनी वाढून ८,७७० कोटी रुपये झाला होता.


  * फ्लिपकार्ट ८० पेक्षा जास्त श्रेणीमध्ये ८० लाख उत्पादनांची विक्री करते. कंपनीच्या १० कोटी नोंदणीकृत युजर, एक लाख विक्रेते, २१ वेअरहाउस आणि दररोज एक कोटी पेज व्हिजिट आहेत.

 • walmart is set to announce the purchase of a majority stake in flipkart
 • walmart is set to announce the purchase of a majority stake in flipkart
  वॉलमार्ट 21 अब्ज डॉलरमध्ये फ्लिपकार्टचा 70 % हि‍स्‍सा खरेदी करत आहे.

Trending