आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर खरेदीला येणार 'अच्छे दिन'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून मंदीत सुरू असलेल्या घर खरेदीला पुन्हा "अच्छे दिन' येण्याचे संकेत मिळत आहेत. आर्थिक संशोधन करणारी कंपनी जाईफिन रिसर्चच्या अहवालानुसार नवीन घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.
व्याजदर कपात आणि रोजगाराच्या वाढलेल्या संधी यामुळे नागरिकांचा मालमत्ता खरेदीकडे कल वाढला असल्याचे कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. कंपनीच्या अहवालानुसार स्वस्त घरे मिळत असल्याने घर खरेदीत सकारात्मकता वाढत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारही या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याच्या तयारीत आहेत.

जाईफिन रिसर्चच्या अहवालानुसार कॅबिनेटने रिअल इस्टेट नियामक बिल मंजूर केल्यामुळे येणाऱ्या काळात घर खरेदीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. २०१४ च्या तुलनेत या वर्षी घर खरेदीत हळूहळू वाढ होत असल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.

गेल्या वर्षी २०१४ मध्ये या क्षेत्राची वाढ ३०.७ होती. या वर्षी ४३.९ पर्यंत ही वाढ गेली आहे. येणाऱ्या काळात व्याजदरात आणखी घट होण्याची शक्यता असल्याने या क्षेत्रात आणखी मागणी वाढण्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे. देशातील ११ शहरांत ३००० नागरिकांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

व्याजदर कमी झाल्याचा खरेदीवर परिणाम
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे या क्षेत्रात वाढ झाली असल्याचे कंपनीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये घर खरेदी करण्याचा उत्साह वाढला आहे. या क्षेत्रात पारदर्शी व्यवहार, वेळेवर ताबा अशा बाबींवर लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत कंपनीचे मुख अर्थतज्ज्ञ देबोपम चौधरी यांनी व्यक्त केले. देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्यामुळे नागरिकांचा त्यांची नोकरी सुरक्षित असल्यावरचा विश्वास वाढला आहे. त्यामुळेच या क्षेत्रात सकारात्मकता वाढली असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.