आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याचे भाव आणखी घसरण्याची शक्यता, अमेरिकेच्या व्याजदराचा परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष जेनेट येलेन यांनी या वर्षी व्याजदरात वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे भाव उतरले असून सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शुक्रवारी सोन्याचे भाव ०.१० टक्के कमी झाले आहेत. सोन्याच्या किमती कमी होण्याचा हा सलग तिसरा आठवडा आहे. तज्ज्ञांच्या मते भारतीय बाजारात सोन्याच्या किमती २५,५०० रुपये प्रति तोळ्यापर्यंत खाली येऊ शकतात. सध्या सोने २६,००० च्या जवळपास आहे.

अमेरिकेत व्याजदरात वाढ
फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेनेट यांनी या वर्षी व्याजदरात वाढ हाेणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, रोजगाराच्या संख्येत वाढ झाली तरच व्याज दरवाढ करता येईल
हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. मात्र, वर्षभरात फेडरलच्या होणाऱ्या चार बैठकांपैकी किती वेळा व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे, हे त्यांनी सांगितले नाही.
मागणी घटली
सध्या चीनचा शेअर बाजार मोठ्या पडझडीनंतर सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याऐवजी शेअर बाजारात पैसे लावत आहेत. गेल्या एक महिन्यात चीनचा शेअर बाजार ३० टक्क्यांनी खाली आला आहे. सध्याची मागणी पाहिली तर चीन आणि भारतात सोन्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
दिल्ली, मंुबईत भाव स्थिर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव उतरल्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या व्यवहारात मंदी दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात सोन्याची २६,३३० रुपये प्रति तोळ्याने विक्री झाली, तर चांदीची २४० रुपयांच्या वाढीसह ३५,७५० रुपये प्रति किलोग्रॅमवर विक्री झाली. मुंबई सराफा बाजारात सोने २६,१७० रुपये प्रति तोळ्याने विक्री झाले, तर चांदीची ३६,०९५ रुपये प्रति किलोग्रॅमवर विक्री झाली. शुक्रवारच्या तुलनेत मुंबईत सोन्याचे भाव ३० रुपये प्रति तोळा कमी झाले आहेत.
किमती कमी होण्याची शक्यता
अमेरिकेत व्याज दरवाढ होणे नक्की आहे, तर ग्रीसचे संकटदेखील थोड्याफार प्रमाणात कमी होण्याची आशा आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होईल. सोने २५,५०० रुपये प्रति तोळ्यापर्यंत येऊ शकते.
-अनुज गुप्त, एव्हीपी, एंजल कमोडिटी