आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील नव्या योग उद्योगाला मोठी चालना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्थसत्ता - महासत्ता
३५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी राजपथावर योगासने करून गिनीज बुकात नाव झळकवले, भारतातही ‘योग उद्योग’ वाढीला लागला असून येत्या काही वर्षांत ती शेकडो कोटींची बाजारपेठ ठरण्याची शक्यता असल्यामुळे उद्योग क्षेत्राला नव्या संधी मिळत आहेत.

- देशातील १ कोटी लोकांच्या योगासनांसाठी स्वतंत्र मॅट आणि खास पोशाखासाठी उद्योग
जगभरात आजही २० कोटींहून अधिक लोक नियमित योगासने करतात. पैकी निम्मे भारतीय आणि अनिवासी भारतीय. दिल्लीत योगासन कार्यक्रमात सहभागींना गिनीज बुकाच्या प्रमाणीकरणानुसार क्रमांक लिहिलेल्या मॅट्स दिल्या होत्या, सर्वांनी विशिष्ट पोशाख घातला होता. मोदी सर्वांत पुढे साध्या सतरंजीवर साधा पांढरा लेंगा झब्बा घालून आसने करीत होते. कारण भारतीयांच्या दृष्टीने योगासनांच्या वेळी सतरंजी, सैलसर कपडे एवढ्याच गोष्टी पुरेशा असतात. देशात १ कोटी लोक योगासने करतात त्यासाठी मॅट, खास पोशाख करणारे उद्योग कधी उभे राहिले नाहीत. अमेरिकेत मात्र वेगळे घडले.

- अमेरिकेतील योगा उद्योग झाला ३० अब्ज अमेरिकन डॉलर्सचा
योगासने अमेरिका, पाश्चात्य देशांत रुजवताना तेथील लोकांची गरज, मानसिकतेचा विचार गरजेचे होते. आपल्याकडे योगसाधनेला असणारा आध्यात्मिक आशय, रंग अमेरिकेत देणे अडचणीचे होते. पहिल्यांदा आध्यात्मिक गुरूंनीच योगासने अमेरिकेत रुजवली, हे खरे. पण अमेरिकेत उद्योजकांनी जेव्हा योगसाधनेमध्ये आर्थिक गुंतवणूक केली, तेव्हा योग ‘फिटनेस फंडा’ म्हणून समोर आला आणि आज तो ३० अब्ज अमेरिकन डॉलर्सचा उद्योग झालाय. यात योगासनांसाठी व्यायामशाळेप्रमाणे मोठे सभागृह उभे करणे, उत्तम प्रशिक्षक, योगासनांच्या वेळी वापरण्याच्या मॅट्स, विशिष्ट पोशाख यांचा समावेश आहे. त्यासह योगा पुस्तके, सीडी, डीव्हीडी यांची बाजारपेठही मोठी आहे. योग भारतीय असला, तरी त्याचा उद्योग उभा राहिला तो अमेरिका, कॅनडात हे लक्षात घ्या.
- कॅनडातील लुलुलेमन अॅथलेटिका ही योगापोशाखाची मोठी कंपनी, महसूल ४२ कोटी ३५ लाख
अमेरिकन डॉलर्सचा :
कॅनडातील लुलुलेमन अॅथलेटिका ही कंपनी योगाचे पोशाख तयार करणारी सर्वांत मोठी कंपनी आहे. यंदाच्या अािर्थक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील कंपनीचा महसूल ४२ कोटी ३५ लाख अमेरिकन डॉलर्स एवढा आहे. अमेरिका कॅनडामध्ये योगसाधना रुजून ५० वर्षे उलटली तरी योगपोशाख तयार करणारा एकही भारतीय उद्योजक तयार झाला नव्हता. आता लुलुलेमनला दोन भारतीय उद्योजकांनी जबरदस्त आव्हान उभे केले आहे. बंगळुरूची स्टार्ट अप कंनी ‘प्रोयोग’ने अमेरिका व कॅनडाच्या बाजारपेठेत जोरदार प्रवेश केलाय. ‘अॅथलिझर’ या कॅटेगरीत ही उत्पादने विकली जाताहेत. तेथे आता सर्रास वापरल्या जाणाऱ्या डेनिमऐवजी लोक ‘प्रोयोग’ कपडे वापरतात. त्यामुळे मुलांना शाळेत सोडताना, मॉलमध्ये जातानाही हे ‘प्रोयोग’ कपडे वापरले जातात. त्याच्या मॅट्सही लोकप्रिय झाल्या.

- न्यूयॉर्कमधील योगदिनी भारतीय महिलेच्या योगास्मोगा कंपनीने पुरवले ३० हजार ड्रेस
कॅनडातील तपस्या बाली या भारतीय महिलेने वॉलस्ट्रीटवरची मोठी नोकरी सोडून ‘योगास्मोगा’ स्टार्टअप कंपनी सुरू केली. न्यूयॉर्कमधील या कंपनीची गुंतवणूक साडेसात कोटी अमेरिकन डॉलर्स आहे. टाइम्स स्क्वेअरमध्ये ३० हजार लोकांनी योग प्रात्यक्षिके केली. त्यात ‘योगास्मोगा’चा मोठा वाटा होता.
योग साहित्य विक्रीत ४०० टक्के वाढ नोंदवली गेली :
आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात होणार, हे लक्षात घेऊन भारतातही अनेक स्टार्ट अप कंपन्यांनी योग मॅट्स आणि योग पोशाखांची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात केली आहे. बंगळुरूच्या ‘प्रोयोग’ची उत्पादने आतापर्यंत फक्त निर्यात होत होती. आता २१ जूनपासून ती भारतीय बाजारपेठेतही उपलब्ध झाली आहेत. त्याबरोबरच भूसत्त्व, मोरल फायबर, फॉरएव्हर योगा, दो यू स्पीक ग्रीन आणि अर्बन योगा अशा देशभरातल्या विविध कंपन्यांनी योगविषयक उत्पादने बाजारपेठेत आणली आहेत. या खरेदीत पहिला क्रमांक अर्थातच दिल्लीचा अशा साहित्याला मागणी होती. योग साहित्य विक्रीतील ही वाढ ४०० टक्के नोंदवली गेली आहे, असे असोचेमचे म्हणणे आहे.
कॉर्पोरेटमध्ये योगाला महत्त्व, योगशिक्षक हवेत
याला एक महत्त्वाचे कारण आहे. केंद्र सरकारने आपल्या सर्व मंत्रालयांच्या देशभरातल्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांना नियमित योगशिक्षण देण्याचे ठरविले आहे. भाजपशासित राज्यांनीही असाच निर्णय घेतला, तर ही संख्या आणखी काही कोटींनी वाढेल. गेल्या ५ वर्षांत कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये योगासनांना मोठे महत्त्व आले आहे. हा जो नवा ग्राहक आहे, तो आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असल्यामुळे त्याचा कल नव्या पद्धतीच्या योग मॅट्स आणि पोशाख वापरण्याकडे राहणार आहे. त्यामुळे योगसाहित्याची ही मागणी वाढतच जाईल. त्याबरोबरीने देशांत लाखो योग शिक्षक लागणार आहेत. साहजिकच योग प्रशिक्षण देणारा नवा मोठा उद्योगही आकाराला येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...