नवी दिल्ली - किशोर बियाणीचा फ्यूचर ग्रुप व सुनील मित्तल यांच्या भारती समूहाने रिटेल व्यवसायाच्या विलीनीकरणाचा निर्णय जाहीर केला आहे. फ्युचर रिटेलमधून रिटेल व्यवसाय वेगळा काढून त्याचे भारती एअरटेलमध्ये विलीनीकरण होईल. हा सौदा ७५० कोटी रुपयांचा राहील. याचप्रमाणे भारती रिटेलमधून रिटेल इन्फ्रास्ट्रक्चर व गुंतवणूक व्यवसाय वेगळा करून तो फ्यूचर रिटेलमध्ये समाविष्ट होईल. नव्या कंपन्यांवर फ्यूचर समूहाचे नियंत्रण राहील. फेररचनेमुळेे १५ हजार कोटींची देशातील सर्वात मोठी सुपरमार्केट शृंखला तयार होईल.दोन्ही समूह आता रिटेल व्यवसायात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल आणि ई-कॉमर्स कंपन्यांशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे. फेररचनेनंतर फ्यूचर रिटेलचे नाव फ्यूचर एंटरप्रायझेस तर भारती रिटेलचे नाव फ्यूचर रिटेल होईल. त्याची वेगळी नोंदणी करण्यात येईल. दोन्ही कंपन्यांत फ्यूचरचा हिस्सा ४६-४७ टक्के तर भारतीचा १५ टक्के राहील.
फेररचनेने येणार मजबुती
दोन्ही कंपन्यांची २४३ शहरांत ५७० हून जास्त स्टोअर्स होतील. नवी कंपनी बिग बाजार आणि इझीडेच्या एकूण २०३ हायपर मार्केट, फूड बाजार आणि इझीडेचे १९७ सुपर मार्केट तसेच होम टाऊन, ईझोन, एफबीबी आणि फूट हॉलसह १७१ स्टोअर्स चालवणार आहे.
सध्याची उपस्थिती
सध्या देशभरातील १६६ शहरांत फ्यूचर रिटेलचे ३५० हून जास्त स्टोअर्स आहेत. भारती रिटेलची देशातील ११४ शहरांत इझीडे नावाची २१६ स्टोअर्स आहेत. ती वेगवेगळ्या स्वरूपात आहेत. बहुतेक स्टोअर्स उत्तर भारतात आहेत.
आपला फायदा काय
> दोन्ही कंपन्यांची सोर्सिंग, लॉजिस्टिक्स आणि इतर सेवा सामायिक झाल्याने खर्च कमी होईल. मार्केटिंगचा खर्च कमी होईल. ग्राहकांना यामुळे
जास्त सवलतींच्या रूपाने फायदा होण्याची शक्यता आहे.
> भारती समूहाची मोबाइल कंपनी एअरटेल आपल्या ग्राहकांना एसएमएसद्वारे या रिटेल स्टोअर्समध्ये मिळणा-या सवलतींची माहिती देईल.
शेअर्संची अदलाबदल
> फ्यूचर रिटेलच्या समभागधारकांना दोन रुपयांच्या एका शेअरच्या बदल्यात भारती रिटेलचा दोन रुपयांचा एक शेअर मिळेल. याची नोंदणी
होईल. भारती रिटेल नोंदणीकृत नाही.
> भारती रिटेल समभागधारकांना दोन रुपयांच्या शेअरच्या बदल्यात फ्यूचर रिटेलचे दोन रुपये मूल्याचा एक शेअर दिला जाईल. फ्यूचर रिटेल
नोंदणीकृत आहे. सोमवारी हे शेअर्स बीएसईमध्ये १२.०६ टक्के वाढीसह बंद झाले.
४००० छोटे स्टोअर्स
भारती रिटेलचे जाळे, मजबुती फ्यूचर रिटेलसाठी पूरक आहे. आणखी लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. यामुळे दोन्ही कंपन्यांच्या समभाग धारकांनाही लाभ होईल. वर्ष २०२१ पर्यंत ४००० छोटे स्टोअर्स उघडणार आहोत.
किशोर बियाणी, सीईओ, फ्यूचर समूह.