आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थ विभाग : उद्योगांचा सीएसआर निधी पाच क्षेत्रांत नेटका खर्च होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- ‘कंपन्यांचा सीएसआर निधी नियोजनबद्ध रीतीने निवडक क्षेत्रांत खर्च व्हावा, त्यातून त्या क्षेत्रात परिणामकारक बदल साधता यावेत, असे राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. अर्थ विभागाने त्यासाठी अंगणवाड्यांचा विकास, जलयुक्त शिवार योजना, महिलांचे स्वयंरोजगार प्रशिक्षण, वृक्ष लागवड मोहीम, शालेय शिक्षण या पाच क्षेत्रांची निवड केली असून, अर्थ विभाग कंपन्यांशी यासंदर्भात चर्चा करणार आहे.
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवार, २७ सप्टेंबरला ‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना याबाबत माहिती दिली. राज्य सरकार निवडक क्षेत्रांच्या विकासासाठी कार्पोरेट्सच्या सीएसआर निधीची मदत घेणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी एप्रिलमध्ये केली होती. मात्र, त्यावर अंमलबजावणीस विलंब झाला. अर्थ विभागाने दोन कोटींहून अधिक सीएसआर निधीची (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी) तरतूद असलेल्या राज्यातील कंपन्यांची यादी तयार करण्याची जबाबदारी केपीएमजी या सल्लागार कंपनीला दिली, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. या कंपन्यांमध्ये खासगीच नाही तर वेस्टर्न कोल फिल्ड्ससारख्या सरकारी उपक्रम कंपन्यांचाही समावेश असेल. या कंपनीकडून यादी मिळाल्यावर योजनेला वेग येईल, असा दावा करून मुनगंटीवार म्हणाले की, अर्थ खात्याने अंगणवाड्यांचा विकास, जलयुक्त शिवार योजना, महिलांचे स्वयंरोजगार प्रशिक्षण, वृक्ष लागवड, शिक्षण अशी पाच क्षेत्रे निश्चित केली असून, या क्षेत्रांत सीएसआर निधी खर्च व्हावा, अशी विनंती शासनाकडून उद्योग जगताला केली जाणार आहे. हा निधी कंपन्यांनी त्या क्षेत्रात खर्च करायचा की त्यासाठी संस्था स्थापन करायची याचा निर्णय होणार आहे. या योजनेचे प्रेझेंटेशन राज्यपालांना केले जाणार आहे. सीएसआर निधीची रक्कम एक हजार कोटींपेक्षा अधिक असू शकते, असा अंदाज अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. दुष्काळी परिस्थिती पाहता जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्याचे शासनाचे नियोजन आहे. सीएसआर निधीचा त्यासाठी फायदा व्हावा, अशी आमची अपेक्षा असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. सीएसआर निधी खर्च करताना तो राज्यात नाही तर गरज आहे अशाच क्षेत्रात खर्च करण्याचे प्रयत्न राहतील. त्यासाठी जिल्हे, त्यातील कामाचे स्वरूपही निश्चित केले जाणार असल्याचे ते म्हणाले.
सीएसआर निधीच्या विनियोगाने विकास
कंपन्यांचा सीएसआर निधी कुठेतरी विस्कळीत स्वरूपात खर्च होतो. तो नेमकेपणाने खर्च झाल्यास त्यातून विकासाचे दृश्य परिणाम दिसू शकतील.
सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री.