आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिक भारताचे मंदिर इन्फोसिस बनले ‘संस्थापक विरुद्ध बाहेरील’ वादाचे केंद्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इन्फोसिसकॅम्पसला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘आधुनिक भारताचे मंदिर’ म्हटले होते. मात्र, वर्षभरापासून हे ‘संस्थापक विरुद्ध बाहेरील’ वादाचे केंद्र बनलेले आहे. विशाल सिक्का येथील पहिलेच नॉन-प्रमोटर सीईओ होते. त्यांच्याआधी इन्फोसिसच्या संस्थापकांनीच एकानंतर एक सीईओ पदाची जबाबदारी सांभाळली होती.
 
कंपनीच्या संचालक मंडळात कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचा दावा सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर गुंतवणूकदार आणि मीडियाशी बोलताना कंपनीचे अध्यक्ष आर. शेषशायी आणि सह-अध्यक्ष रवी व्यंकटेशन यांनी केला आहे. मात्र, वादाची प्रचिती लवकरच येणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नवीन व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या नियुक्तीमध्ये संस्थापकांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप राहणारच असल्याचेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी शेअरधारकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, “मला पैसा, पद किंवा सत्ता नको आहे. सिक्का यांच्या कामावरही टीका करण्याची माझी इच्छा नाही. पण मला इन्फोसिसमध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या घसरत चाललेल्या पातळीची चिंता वाटत आहे. संचालक मंडळाने मोजक्या लोकांचे रक्षण करता, इन्स्टिट्यूशनची रक्षा करायला हवी, माझी केवळ इतकीच इच्छा आहे.’
 
कंपनीच्या संस्थापकांनी सिक्का यांच्या खासगी विमानाने प्रवास करण्यावरही प्रश्न उपस्थित केले होते. २०१६ मध्ये सिक्का यांनी ८०० तास हवाई प्रवास केला. यातील ९९ व्यावसायिक तर १७ वेळा खासगी विमानाचा वापर करण्यात आला होता. यावर ग्राहकांसोबत बराच वेळ घालवावा लागत असल्याचे स्पष्टीकरण सिक्का यांनी दिले होते. कंपनीचा ६० टक्के महसूल अमेरिका तर १० टक्के ऑस्ट्रेलियामधून येतो.
 
निवडीसाठी पाच सदस्यांची समिती
इन्फोसिसच्या संचालक मंडळाने नवीन सीईअोची निवड करण्यासाठी समितीला जबाबदारी सोपवली आहे. वार्षिक अहवालानुसार या समितीत पाच सदस्य असतील. न्यूयॉर्क विद्यापीठ शांघायचे कुलगुरू प्रो. जेफरी एस. लेमॅन या समितीचे अध्यक्ष असतील. ते इन्फोसिस मंडळातील स्वतंत्र संचालकदेखील आहेत. इतर चार सदस्यांमध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे प्रोव्होस्ट प्रो.जॉन डब्ल्यू. एचमेंडी, बायोकॉनच्या सीएमडी किरण मजुमदार-शॉ, सूर्या सॉफ्टवेअरचे संस्थापक डी.एन. प्रल्हाद आणि इन्फोसिसचे अध्यक्ष आर.शेषशायी यांचा समावेश आहे.
 
तेजीचा फायदा संस्थापकांना
सिक्का सीईओ झाल्यानंतर इन्फोसिसच्या शेअरच्या किमतीमध्ये तेजीने वाढ झाली होती. केवळ पाच महिन्यांत म्हणजेच डिसेंबर २०१४ मध्ये कंपनीच्या शेअरचे भाव ३१ टक्क्यांनी वाढले होते. त्याचा फायदा संस्थापकांनी देखील घेतला होता. नारायणमूर्ती, नंदन निलेकणी, एस.डी. शिबूलाल आणि के.दिनेश यांनी डिसेंबर २०१४ मध्ये सुमारे ७,००० कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली होती.
 
सिक्का यांच्या कार्यकाळात शेअरचे भाव २२% वाढले
सिक्कायांनी एक ऑगस्ट २०१४ रोजी सीईओची जबाबदारी सांभाळली, त्या दिवशी इन्फोसिसच्या शेअरचे मूल्य ८३५ रुपये होते. त्यांच्या राजीनाम्याच्या आधी गुरुवारी १०१८ रुपये होते. म्हणजेच शेअरच्या दरात २२ टक्क्यांची वाढ झाली. तीन वर्षांत सिक्का यांनी कंपनीच्या शेअरधारकांना १९,००० कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...