आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Recession Diamonds Workers Become Unemployed

मंदीमुळे हिरे कारागिरांवर बेरोजगारीचे सावट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिरे उद्याेग सध्या केवळ मंदीतच नाही तर कच्च्या हि-यांच्या वाढलेल्या किमती, विदेशातील हिरे वितरकांनी कर्ज परतफेडीचा कमी केलेला कालावधी, राेकडसुलभतेचा प्रश्न, बँकांच्या अर्थ साहाय्यात झालेली कपात अशा अनेक समस्यांनी ग्रासला अाहे. यावर उपाय म्हणून किमान एक महिना कच्च्या हि-यांच्या अायातीवर पूर्ण बंदी घालण्याचा मुंबई अाणि सुरत येथील हिरे व्यापा-यांचा विचार हाेता. मुंबईतील भारत डायमंड बाेर्समध्ये मंगळवारी या संदर्भात एक महत्त्वाची बैठकही झाली. परंतु अायातीवर बंदी घातल्यास हिरे कारागीर बेकार हाेण्याची भीती लक्षात घेऊन ही बंदी अाणखी एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय
घेण्यात अाला.
या बैठकीत मुंबई डायमंड मर्चंट, जेम्स अॅँड ज्वेलरी कौन्सिल व अन्य काही संस्थांचे पदाधिकारी आणि सुरतमधील व्यापारी सहभागी होते.
वित्तीय असुरक्षिततेचे वातावरण, कच्च्या हि-यांच्या वाढलेल्या किमती, मध्यपूर्व, चीन, हाँगकाँग, अमेरिका या प्रमुख बाजारपेठांत पाॅलिश केलेल्या हि-यांची घटत असलेली मागणी, थकबाकीचे वाढलेले प्रमाण, हिरे व्यवसायाची पंढरी मानल्या जाणा-या अॅँटवर्पमधील कच्च्या हि-याच्या वितरकांनी कर्ज परतफेडीचा १८० दिवसांवरून ६० दिवसांवर अाणलेला कालावधी अशा विविध दुष्टचक्रातून हिरे उद्याेगाची मार्गक्रमणा
सुरू अाहे. या संक्रमणातून बाहेर पडण्यासाठी कच्च्या हि-यांच्या अायातीवर किमान एक महिना बंदी घालण्याचा विचार मुंबई आणि सुरत येथील हिरे उद्याेगातील
व्यापा-यांचा हाेता.

बंदी घातली तर लाखो कामगारांचा प्रश्न
कच्च्या हि-यांच्या अायातीवर एक महिना बंदी घातली तर कच्चा माल येणार नाही. कच्चा माल नसेल तर कामगारांना काम कसे देणार हा प्रश्न हाेता. मुंबई व सुरतमध्ये मिळून अंदाजे बारा ते तेरा लाख कामगार असून त्यांची साेय करणे महत्त्वाचे अाहे. त्यामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात अाल्याचे हिरे व्यापारी व नाइन डायमंडचे मालक संजय शहा यांनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना सांगितले.

उत्पादन सुरू राहिले पाहिजे
उत्पादन जास्त झाल्यामुळे कच्च्या हि-यांची अायात बंद केली तर समस्येतून सुटका हाेईल. पण यामुळे कारागिरांवर विपरीत परिणाम हाेण्याची भीती अाहे. उलट व्यापा-यांचा थाेडा नफा कमी झाला तरी चालेल; पण उत्पादन सुरू राहिले पाहिजे.
जिग्नेश मेहता, व्यवस्थापकीय संचालक, डिव्हाइन साॅलिटेअर्स