आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांतील स्वावलंबनाचे देशापुढे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्थसत्ता - महासत्ता
मोबाइलपासून टॅब्लेट ते गेमिंग कन्सोलपर्यंतची उत्पादने भारतात कमालीची लोकप्रिय ठरत आहेत. अशा वेळी यात भारतीय उद्योजकांना उभे करायचे तर देशी उत्पादननिर्मितीला सरकारी प्रोत्साहनाची गरज आहे.

‘डिजिटल इंडिया वीस’चे उद‌्घाटन करत असताना पंतप्रधान मोदी यांनी या मोहिमेंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने भारतातच तयार व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे हब बनविण्याचे मोदी यांचे स्वप्न आहे. भारतात आजही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले, तरी स्वावलंबी किंवा स्वयंपूर्ण होण्याचे आव्हान सोपे नाही. त्यासाठी सरकारचे धोरणात्मक निर्णय, उत्पादनांच्या किमती कमी ठेवता येतील, अशी करपद्धती आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग भरभराटीला यावा, यासाठी योग्य वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.

मुक्त व्यापार करारामुळे फायदा परदेशी कंपन्यांचा
उद्योग-व्यवसायासंबंधातली केंद्र सरकारची धोरणे आजवर सतत धरसोडीची राहिली असल्याने उद्योगांना उत्पादनासंबंधीचे निश्चित धोरण ठरविणे अवघड होऊन जाते. रंगीत टी.व्ही.सेट भारतात आले, तेव्हापासून 1990 पर्यंत भारतीय उद्योजक टी.व्ही.सेट निर्मितीत आघाडीवर होते. केंद्राने मुक्त व्यापार करारावर सही केल्यानंतर चीन, थायलंड, मलेशियासारख्या देशांमधून कमी किमतीचे पण आकर्षक टी.व्ही.सेट बाजापेठेत आले आणि भारतीय उद्योग कोलमडून पडले. सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या उत्पादनांतही असेच घडले. त्यामुळे देशातली बाजारपेठ गतीने वाढत असताना, बोलबाला राहिला, तो परदेशी उत्पादनांचा. हे चित्र बदलायचे तर सरकारला दूरगामी धोरणे ठरवून, ती अमलात आणावी लागतील.

सेट टॉप बॉक्स तयार करणारे केवळ दोनच उद्योग भारतात
येत्या 5 वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या क्षेत्रात मागणी खूपच वेगाने वाढणार आहे. या मागणीला पुरे पडण्यासाठी खूप मोठी उत्पादन आणि वितरणाची साखळी, या क्षेत्रात उभी करावी लागेल. ‘डायरेक्ट टू होम’ या संकल्पनेने टी.व्ही.उद्योगात मोठी क्रांती घडवून आणली. येत्या काही वर्षांत देशात 75 कोटींपेक्षा जास्त सेट टॉप बॉक्सची गरज भासणार आहे. मात्र भारतात सेट टॉप बॉक्स तयार करणारे मोजकेच उद्योग आहेत. त्यातही दोन उद्योगांनीच आयात उत्पादनांच्या तोडीस तोड सेट टॉप बॉक्स तयार केले आहेत. इतर उत्पादकांना मात्र सुट्या भागांच्या आयातीवरच अवलंबून राहावे लागत आहे. 75 कोटी सेट टॉप बॉक्सेसची मागणी पूर्ण करायची, तर देशात अस्सल देशी उत्पादन करणारे 100 उद्योग तरी उभे करावे लागतील.

75 कोटींपेक्षा जास्त सेट टॉप बॉक्सची गरज भासणार, 100 उद्योग तरी उभे करावे लागतील

भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे हब बनविण्याचे मोदी यांचे स्वप्न, भारतीय अभियंते सक्षम मात्र प्रोत्साहनाची गरज

सुटय़ा भागांची आयात करून, जोडणी करून ‘मेड इन इंडिया’ असे लेबल लावण्याचा मोह देशी उद्योजकांनी टाळावा

मोबाइल, टॅब्लेट ते गेमिंग लोकप्रिय
पण देशी उत्पादने महागच
मोबाइलपासून टॅब्लेट ते गेमिंग कन्सोलपर्यंतची उत्पादने भारतात कमालीची लोकप्रिय ठरत आहेत. अशा वेळी या क्षेत्रात भारतीय उद्योजकांना ताठपणे उभे करायचे असेल, तर देशी उत्पादनांच्या निर्मितीला सरकारी प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. देशात विकल्या जाणाऱ्या एकूण इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांपैकी टॉप 25 उत्पादनांची यादी करून या उत्पादनांत देशी उत्पादनांचा आग्रह धरायला हवा, आणि देशी उत्पादने लोकप्रिय व्हावीत, यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. आपल्याकडील करपद्धतीमुळे देशी उत्पादनांच्या किमती आयात वस्तूंच्या किमतींच्या दुप्पट-तिप्पट राहतात. यामुळे स्वतः संपूर्ण उत्पादन भारतातच करण्याऐवजी सुटय़ा भागांची आयात करून, जोडणी करून ‘मेड इन इंडिया’ असे लेबल लावण्याचा मोह देशी उद्योजकांना होतो. हे थांबविण्यासाठी करपद्धतीत बदल किंवा उत्पादकांना अनुदान आणि सोयी-सवलती, असे धोरण स्वीकारावे लागेल.

‘डिजिटल इंडिया’ मुळे संगणकाची मागणी १०० पटींनी वाढणार
भारतात संगणक वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ‘डिजिटल इंडिया’ मुळे ती 100 पटींनी वाढेल. पण संगणकाची निर्मिती करण्याऐवजी सॉफ्टवेअर तयार करण्यातच मश्गूल आहोत. आपल्या प्रचंड वाढत्या मागणीमुळे अमेरिकन संगणकाची किंमत 3 लाखांवरून 25 हजारांवर आली. तरीही आपण संगणक उत्पादनाचा आग्रह धरलेला नाही. आजही ‘मेड इन इंडिया’ म्हणून विकले जाणारे संगणक चीन, मलेशिया, एवढेच नव्हे, तर तैवान आणि व्हिएतनामकडून सुटे भाग आयात करून, तयार केले जातात. संगणकातील हार्ड डिस्क, चिप्स, मेमरी, ग्राफिक कार्ड इत्यादी सर्व गोष्टी भारतात तयार करण्यास भारतीय इंजिनिअर सक्षम आहेत.

वर्षाला ८० लाख फ्लॅट टी.व्ही. विक्री, २०% मागणी वाढ, २५% उत्पादन भारतात
फ्लॅट टी.व्ही.ला भारतात सर्वाधिक मागणी आहे. दरवर्षी 80 लाख संच विकले जात असून, त्यात 20 टक्क्याने वाढ होत आहे. मागणीपैकी 25 टक्केच संच भारतात तयार होतात. बाकीचे 75 टक्के संच थेट परदेशांतून आयात होतात किंवा सुटे भाग आयात करून, त्यांची जोडणी केली जाते. सध्या एलसीडी, एलईडी टी.व्ही.संचांचा ट्रेंड लोकप्रिय आहे. या उत्पादनासाठी आवश्यक मदरबोर्ड, ट्रान्सफॉर्मर, पॉवर कनेक्टर्स, प्लास्टिक आणि इतर काही सुटे भागच फक्त भारतात बनतात. पण या संचांसाठी आवश्यक असणारी पॅनेल्स मुख्यतः आयात होतात. संचाच्या एकूण किमतीच्या 45 टक्के किंमत या पॅनेलचीच असते. ‘व्हिडिओकॉन’वगळता पॅनेल्सची निर्मिती भारतात इतरत्र होत नाही.
बातम्या आणखी आहेत...