आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजीमुळे डाळींचा तडका, तर खाद्यतेलाचा भडका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - चालू वर्षात अपुऱ्या अाणि अवेळी झालेल्या पावसामुळे यंदा तूर, उडीद, मुगाच्या उत्पादनात घट झाली. त्यामुळे बाजारात डाळींमध्ये कमालीची तेजी हाेत अाहे. मागील वर्षीच्या तुलनेत सर्वच डाळींमध्ये किलाेमागे २५ ते ३० रुपयांची वाढ झाली अाहे. खाद्यतेलही किलाेमागे तीन-चार रुपयांनी वधारले अाहे.
चालू वर्षात जूनपासून किराणा बाजारात फारसे समाधानकारक चित्र नव्हते. सण, उत्सव तसेच विशेष प्रसंगाच्या वेळीही साधारण ग्राहकी हाेती. मार्चपर्यंत बाजारात फारसे अाशादायी चित्र नव्हते. बाजारात ग्राहकी असायची; परंतु नियमित व साधारण हाेती. नंतर मात्र मागणी वाढल्याने डाळींच्या भावात तेजीला सुरुवात झाली. तूरडाळीचे भाव दहा हजार रुपये क्विंटलपर्यंत पाेहोचले अाहेत. मागील वर्षीच्या तुलनेत क्विंटलमागे २५०० रुपयांची तेजी असून अाणखी भाव वधारतील, असे संकेत मिळत अाहेत. लातूर व अकाेला बाजारपेठेतून तूरडाळीची अावक जिल्ह्यात हाेते. फटका प्रतीला अाकारानुसार भाव अाहेत.
उडदाच्या डाळीतही चांगलीच तेजी अाहे. उन्हाळ्यात पापडासाठी तसेच दक्षिणेत दैनंदिन वापरासाठी उडीद डाळीला मागणी असते. मागील महिन्यापासून मागणी हाेत असल्याने व उपलब्धता कमी असल्यामुळे तेजी अाली अाहे. उडीद डाळीचे भाव १० हजार पाचशे रुपये क्विंटल असून मागील वर्षीच्या तुलनेत क्विंटलमागे ३००० रुपयांची वाढ झाली अाहे.
इतर डाळींच्या तुलनेत सर्वच स्तरांतील लाेकांमध्ये बेसनपीठाचा माेठ्या प्रमाणात वापर हाेताे. दैनंदिन वापरात चणाडाळीची मागणी असते. यंदा काही महिने स्थिरावलेल्या चणाडाळीतही वाढत्या मागणीमुळे क्विंटलमागे दीड हजार रुपयांची तेजी अाली अाहे. चार हजार रुपये क्विंटल मिळणारी चणाडाळ ५ हजार ५०० रुपये क्विंटल अाहे. मूगडाळीचीही अशीच स्थिती असून सध्या बाजारात ११ हजार ५०० रुपये क्विंटल भाव अाहे. मागील वर्षी या डाळीचा भाव ९ हजार पाचशे रुपये क्विंटल हाेता. मसूर व मटकी डाळीतही मागील वर्षीच्या तुलनेत किलाेमागे १५ ते २० रुपये तेजी अाहे, तर मसूर डाळीचे भाव ७५ रुपये किलाे अाहे. मागील वर्षी ६३ ते ६५ रुपये किलाे भाव हाेते.
तेलही भडकले
खाद्यतेलाचे दर क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांनी वधारले अाहेत. सूर्यफूल तेलाच्या पंधरा किलाेच्या डब्यात ३५ रुपयांनी वाढ झाली अाहे. सध्या १०७५ ते ११६० रुपये भाव आहेत. साेयाबीन तेलात १५ किलाेमागे ४० रुपयांची तेजी अाहे. ९७५ ते १०५० रुपयांना १५ किलाे डबा तेलाच्या दर्जा व ब्रँडनुसार मिळताे.

जिरे, धने वधारले
दैनंदिन अावश्यक, परंतु लक्षात न येण्याजाेगे जिरा व धने यंदा वधारले अाहेत. फाेडणीला जिरे व मसाल्यासाठी धने ग्राहक मागतात. धन्याचे भाव १४० रुपये किलाे अाहेत. जिऱ्याचे भाव काही महिन्यांपूर्वी १८० रुपये हाेते ते अाता २५० रुपये किलाेपर्यंत पाेहोचले अाहेत. सहा महिन्यांत किलाेमागे ७० ते ८० रुपये तेजी अाली अाहे. बडीशेपच्या दरातही २० ते ३० रुपयांची तेजी अाहे.

क्रूड अाॅइलच्या किमती घसरल्याचा परिणाम

क्रूड अाॅइलच्या किमती घसरल्याचा परिणाम म्हणून डिटर्जंट साबणाच्या किमतीत हिंदुस्तान लिव्हरने पाच ते सात टक्के कपात केली अाहे. वेगवेगळ्या अाॅफरमधून ग्राहक अाकर्षित केले जात अाहेत. तुलनेत इतर कंपन्यांच्या उत्पादनांच्या किमती जैसे थे अाहेत.