आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीडीपी विकासदर केवळ 7.4 % राहण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आर्थिक बाबतीत देशाचा थिंक टँक मानल्या जाणाऱ्या एनसीएईआरने विकासदराचा अंदाज घटवला आहे. चालू आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये जीडीपी विकासदर ७.४ टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याआधी ऑगस्ट महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत ७.५ टक्के विकासदराचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

कृषी क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे विकासदर कमी राहण्याची शक्यता असल्याचे मत नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चच्या (एनसीएईआर) वतीने व्यक्त करण्यात आले आहे. खराब मान्सूनमुळे कृषी विकासदरात घट झाली आहे. तसे पाहिले तर औद्योगिक क्षेत्रात सलग मजबूत आकडेवारी येत असून सेवा क्षेत्रातील आकडेवारीही संमिश्र स्वरूपातील आहे.
अर्थमंत्रालयाच्या वतीने चालू आर्थिक वर्षात ८.१ ते ८.५ टक्के विकासदराचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत ते साध्य करणे शक्य नसल्याचेच दिसून येत आहे. यातील पहिल्या तीन महिन्यांत (एप्रिल ते जून) विकासदर केवळ सात टक्के होता. आयएमएफ-जागतिक बँकेसह अनेक संस्थांनीही या वर्षी विकासदर ७.५ टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एनसीएईआरच्या मते, निर्यातीची मागणी कमी आहे, देशांतर्गत विचार केल्यास ग्रामीण भागातील मागणीत वाढ दिसत नाही. मागणी नसल्यामुळे गुंतवणुकीतही वाढ झालेली नाही. त्यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेत मंदी असल्याचे जाणवत आहे. खनन क्षेत्रात कोणत्याच प्रकारचा विकास झाला नसल्याचे मतही संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. वीज उत्पादनातील वाढदेखील जास्त झालेली नाही. तर भांडवली मालमत्ता (मशिनरी) आणि ग्राहकोपयोगी वस्तूंमधील (फ्रिज, टीव्ही इत्यादी) स्थिती गेल्या वर्षीपेक्षा चांगली आहे. मात्र, ग्राहकोपयोगी बिगर वस्तूंमधील विकास नकारात्मक आहे.
जून ते सप्टेंबरदरम्यान कमी पाऊस झाला आहे. असे असले तरी डाळवर्गीय पिकांच्या भागांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी खरिपाचे एकूण उत्पादन जास्त होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत या वर्षी किरकोळ महागाई १.४ टक्के कमी आहे.

उत्पादन क्षेत्राची कामगिरी चांगली
या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत (एप्रिल ते सप्टेंबर) औद्योगिक क्षेत्राने चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत औद्योगिक उत्पादनात २.९ टक्क्यांची वाढ झाली होती. ही सुधारणा विशेषकरून उत्पादन क्षेत्रामुळे होती. यामध्ये गेल्या वर्षीच्या २.२ टक्क्यांच्या तुलनेत ४.२ टक्क्यांची वाढ झाली.