आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 कॅरेटपेक्षा जास्त शुद्ध दागिने निर्यातीवर बंदी, व्‍यापा-यांच्‍या फसवणुकीमुळे सरकारचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काही व्यापारी दुतर्फा फायदा घेत फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे  सरकारने २२ कॅरेटपेक्षा जास्त शुद्धतेच्या सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीवर  बंदी घातली आहे. विदेश व्यापार संचालनालयाने (डीजीएफटी) नोटिफिकेशनच्या माध्यमातून सोन्याच्या आठ कॅरेट आणि २२ कॅरेटपर्यंतच्याच दागिन्यांची निर्यात करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हा नियम देशांतर्गत बाजार, निर्यातीवर आधारातील युनिट, इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर आणि बायो टेक्नॉलॉजी पार्क यांच्यावरही लागू असेल.

  गेल्या वर्षी जेम्स ज्वेलरीच्या एकूण निर्यातीमध्ये सोन्याचे नाणे आणि मेडॅलियनची भागीदारी १५ टक्के होती. या निर्णयामुळे आता निर्यातदारांना इन्सेंटिव्हदेखील आठ आणि २२ कॅरेटच्या वस्तूंवरच मिळेल. काही निर्यातदार २२ कॅरेटपेक्षा जास्त शुद्ध सोन्याच्या दागिन्यांची आयात करण्याचा तसेच त्यात किरकोळ बदल करून (व्हॅल्यू अॅडिशन) निर्यात करण्याचा दावा करत होते. या पद्धतीने ते इन्सेंटिव्हदेखील घेत होते. वास्तविक अशी शक्यता नाही. भारत शुद्ध सोन्याचा आयातक देश आहे. २२ कॅरेटपेक्षा जास्त शुद्धतेचे सोने आयात करून त्यात व्हॅल्यू अॅडिशन करून त्याची नंतर निर्यात करणे हा फायद्याचा व्यवहार ठरू शकत नसल्याचे जेम्स अँड ज्वेलरी निर्यात प्रमोशन परिषदेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे असा निर्णय घेण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.  

मुक्त व्यापारासंबंधी करार झालेल्या काही देशांमधून काही सोनार कमी करावर दागिने किंवा नाणी आयात करत होते. त्यात कोणताही बदल न करता तोच माल पुन्हा निर्यात करत होते. या पद्धतीने काहीही न करता हे व्यापारी निर्यातीवर इन्सेंटिव्ह घेत असल्याचे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे संयुक्त सचिव केतन श्रॉफ यांनी सांगितले.
आयातक आधी आयात शुल्क वाचवण्यासाठी थायलंड आणि इंडोनेशिया या मार्गाचा अवलंब करत होते.

निर्यातदारांची संघटना फिओच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात २२ कॅरेटपेक्षा जास्त शुद्ध सोन्याच्या दागिन्यांची मागणी अत्यंत कमी असल्याने या निर्णयाचा सोने दागिने निर्यातीवर काहीही परिणाम होणार नाही. दक्षिण कोरियामधून अचानक सोन्याची मागणी वाढलेली असताना सरकारने हा निर्णय घेतला आहे. एक जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान कोरियामधून ३३.८६ कोटी डॉलरचे सोने आयात झाले, तर २०१६-१७ या पूर्ण वर्षभरात तेथून ४७ कोटी डॉलरची अायात झाली होती.
 
अशा पद्धतीने होत होता व्यवहार
- दक्षिण कोरियासारख्या देशासोबत मुक्त व्यापार करार अाहे. तेथून सोने आयात केल्यावर सीमा शुल्क लागत नाही, इतर देशांमधील आयातीवर १० टक्के शुल्क लागते.
- १२.५ % काउंटरव्हेलिंग शुल्क जीएसटीनंतर रद्द झाले आहे. यामुळे कोरियासारख्या देशांमधून सोने मागवल्यावर केवळ ३ टक्के आयजीएसटी भरावा लागतो.
- सुवर्णकार आयात दागिन्याला काहीही न करता किंवा किरकोळ बदल करून निर्यात करतात. त्यानंतर ते सरकारकडे निर्यात इन्सेंटिव्हचा दावा करतात.
बातम्या आणखी आहेत...