आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२१ लाख हेक्टर कडधान्य पेरणी; गेल्या वर्षीपेक्षा ३५ टक्के जास्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - यंदा मान्सून चांगला बरसल्यामुळे चालू खरीप हंगामात आतापर्यंत १२१.१० लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी पाच ऑगस्टपर्यंत ८९.७२ लाख हेक्टरवर कडधान्य पेरणी झाली होती, त्या तुलनेत यंदा ३५ टक्के जास्त पेरणी झाली आहे. मात्र, या वेळी कडधान्याचे पेरणी क्षेत्र वाढल्यामुळे जास्त उत्पादन होऊन डाळींच्या किमती नियंत्रणात राहणार असल्याची अपेक्षा वाढली आहे.

चालू पीक वर्ष २०१६-१७ (जुलै ते जून) दरम्यान डाळींचे उत्पादन १९.४७ टक्के वाढून २०० लाख टनापर्यंत पोहाेचण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या पीक वर्षात १६४.७ लाख टन कडधान्य उत्पादन झाले होते. तर राज्यांनी दिलेल्या अहवालानुसार ५ आगस्टपर्यंत ८८५.२९ लाख हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत ८४१.६५ लाख हेक्टरवर कडधान्य पेरणी झाली होती. केंद्र सरकारच्या वतीने पीक पेरणी संदर्भात दिलेल्या अधिकृत माहितीमध्ये यासंबंधीची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
आतापर्यंत सामान्यपेक्षा २ % जास्त पाऊस
एक जूनपासून सुरू झालेल्या मान्सूनदरम्यान पाच आॅगस्टपर्यंत देशभरात ५०८.३ मिलिमीटर पाऊस झाला असून हा सामान्यपेक्षा (४९९.५ मिलिमीटर) २ टक्के जास्त आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार सहा राज्यांमध्ये आतापर्यंत सामान्यपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे, तर १९ राज्यांमध्ये सामान्य पाऊस झालेला आहे. तर देशातील ११ राज्यांमध्ये अद्याप कमी पाऊस झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत सामन्यापेक्षा ३९ टक्के जास्त पाऊस झाला आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास राज्यात सामान्यपेक्षा २७ टक्के जास्त पाऊस झाला आहे. आंध्र प्रदेशमध्ये सामान्यपेक्षा २६ टक्के जास्त पाऊस झाला. पुडुचेरीमध्ये सर्वात कमी पावसाने हजेरी लावली. येथील पावसाचा आकडा सामान्यपेक्षा ५२ टक्के कमी आहे. त्यानंतर मेघालय आणि मणिपूरमध्ये अनुक्रमे ४३ आणि ४२ टक्के कमी पाऊस झाला.
शेतकऱ्यांना दहा आॅगस्टपर्यंत पीक विमा घेता येईल
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी सरकारने पीक विमा काढण्याची अंतिम तारीख वाढवली असून आता १० ऑगस्टपर्यंत सर्वांना पीक विमा काढता येणार आहे, तर दुसरीकडे पंजाब आणि बिहार सोडले तर इतर २२ राज्यांमध्ये नव्या पीक विमा योजनेला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती शुक्रवारी सरकारच्या वतीने राज्यसभेत देण्यात आली. विशेष म्हणजे चालू पीक वर्षात सरकारने विमा प्रीमियमची रक्कमदेखील कमी केली आहे. चालू खरीप वर्षातच देशातील २२ राज्यांमध्ये नव्या पंतप्रधान पीक विमा योजनेला लागू करण्यात आले असल्याची माहिती कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली. याआधी शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलै ही शेवटची तारीख होती. त्यात मुदतवाढ देत १० ऑगस्ट ही शेवटची तारीख करण्यात आली आहे. १० आगस्टपर्यंत जास्तीत जास्त शेतकरी पीक विमा काढतील, अशी अाशा असल्याचेही सिंह यांनी सांगितले. पीक विम्याचा प्रीमियम ५ टक्के कमी ठेवण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...