आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GST- राहुलची काँग्रेस नेत्यांशी चर्चा, विधेयक मंजूरीची सरकारला आशा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक मंजूर होते की पुन्हा अडकते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यासंबंधी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना चहापानाचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर त्यांच्याशी झालेली चर्चा समाधानकारक झाल्याचा दावादेखील सरकारच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, आता चर्चेच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी यासंदर्भात पक्षातील नेत्यांशी चर्चा केली आहे, तर दुसरीकडे हे विधेयक मंजूर होण्याची आशा सरकारच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जीएसटी विधेयक मंजूर होण्याची सरकारला पूर्ण आशा आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर करसुधारणेबाबत भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठे "गेम चेंजर' म्हणून जीएसटी सिद्ध होणार असल्याचे मत अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले, तर दुसरीकडे राहुल गांधी जीएसटी मंजुरीच्या रस्त्यात आडकाठी आणण्याची शक्यता असल्याची शंका भाजप नेत्यांना वाटत आहे. जीएसटी देशाच्या विकासासाठी किती महत्त्वाचे आहे, हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना समजले असले, तरी राहुल त्यांच्या मतावर अडलेले असल्याची शंकादेखील भाजप नेत्यांना वाटत आहे.
राहुल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खारगे यांनी जीएसटीवर सहमती होण्यासाठी तीन मुद्द्यांवर सहमती होणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भाजपची शंका खरी असण्याची शक्यता वाटते.
काँग्रेसच्या मागण्या
काँग्रेसच्या वतीने जीएसटीची मर्यादा १८ टक्के निर्धारित करणे, वाद झाल्यास निपटारा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था बनवणे आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. मात्र, काँग्रेसच्या या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला काही तांत्रिक अडचणी असल्याचे दिसून येत आहे.