Home »Business »Industries» GST Rules And Regulations

जीएसटी: भेट, चोरी, नष्ट वस्तूंचीही लागेल नोंद; उत्पादन, विक्री अन् सेवा सर्वांसाठी स्वतंत्र नोंद

वृत्तसंस्था | Apr 21, 2017, 03:56 AM IST

  • जीएसटी: भेट, चोरी, नष्ट वस्तूंचीही लागेल नोंद; उत्पादन, विक्री अन् सेवा सर्वांसाठी स्वतंत्र नोंद
नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मध्ये नोंद ठेवणे व्यावसायिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यांना मोफत आलेले सँपल आणि भेटवस्तूंसह चोरी, हरवलेल्या तसेच नष्ट झालेल्या वस्तूंचाही हिशेब ठेवावा लागणार आहे.
खात्यामध्ये नोंददेखील अनुक्रमानुसार करण्यात येणार अाहे. नंतर त्याला खोडता किंवा पुनर्लिखाणही (ओव्हरराइट) करता येणार नाही. जर एखादी चुकीची नोंद झाली तर त्याला अधोरेखित करून सत्यापित (अटेस्ट) करावे लागेल. त्यानंतर नवीन नोंदणी करावी लागेल. केंद्रीय अबकारी आणि कस्टम बोर्डाने (सीबीईसी) रेकॉर्ड ठेवण्यासंबंधी जो मसुदा नियम जारी केला आहे, त्यानुसार व्यावसायिकांना प्रत्येक घडामोडीसाठी स्वतंत्र खाते किंवा नोंद ठेवावी लागणार आहे. उत्पादन, ट्रेडिंग आणि सेवा सर्वांसाठी स्वतंत्र नोंद राहील.
या मसुद्याच्या नियमानुसार वस्तू आणि सेवेसंबंधी सर्व कागदपत्रे ठेवावी लागणार आहेत. म्हणजेच इन्व्हाइस, पुरवठा बिल, डिलिव्हरी चलन, क्रेडिट नोट, डेबिट नोट, पावती, पेमेंट आणि रिफंड व्हाउचर, ई-वे बिल जपून ठेवावे लागेल. ही सर्व कागदपत्रे कधीपर्यंत ठेवावी लागतील यासंबंधीचे नियम जीएसटी नियमासोबत निश्चित होतील. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक नोंदणीचे बॅकअपदेखील ठेवावे लागेल, म्हणजेच मूळ रेकॉर्ड नष्ट झाल्यास बॅकअपचा वापर करता येईल.
या सर्व माहितीचा बॅकअप कधीपर्यंत ठेवावा लागेल, याचा कालावधीदेखील जीएसटीच्या नियामांसोबत निश्चित होणार आहे. देशभरात एकच कर प्रणाली लागू करण्यासाठी जीएसटी एक जुलैपासून लागू करण्याची तयारी सरकार करत आहे. हा “इझ ऑफ डुइंग बिझनेस’च्या दिशेने महत्त्वाचा निर्णय असल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.
प्रत्येक कामासाठी स्वतंत्र नोंदवही
आगाऊ रक्कम मिळणे, भरणा करणे आणि अॅडजस्टमेंटसाठी वेगवेगळे खाते असेल. याचप्रमाणे किती कर लागेल, किती जमा केला आणि किती भरला याचाही स्वतंत्र हिशेब ठेवावा लागेल. किती इनपुट कर क्रेडिट क्लेम केला, याचीही नाेंद ठेवावी लागेल. एक स्वतंत्र खाते कर इन्व्हाइस, क्रेडिट आणि डेबिट नोट, डिलिव्हरी चलनाचे असेल.
स्क्रॅप, वेस्टेजचीही माहिती
उत्पादकाला कच्चा माल, तयार माल आणि खराब झालेला स्क्रॅप यासोबतच वेस्टेजचीदेखील माहिती द्यावी लागणार आहे. ही सर्व माहिती महिन्याच्या आधारावर असेल. सेवा देणाऱ्या कंपनीला प्रत्येक सेवेमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची नोंद ठेवावी लागेल. ती वस्तू किती प्रमाणात लागली तेदेखील सांगावे लागेल. कंपनीने इतर कोणत्या सेवांचा वापर केल्यास त्याचाही उल्लेख करावा लागेल. ज्याला सेवा देण्यात येत अाहे, त्याचीही सर्व माहिती द्यावी लागेल.
सर्वांचा हिशेब होणार
व्यावसायिकाने जितक्या वस्तू घेतल्या किंवा त्यांचा पुरवठा केला, त्या प्रत्येक साठ्याचा हिशेब ठेवावा लागेल. त्या खात्यात ओपनिंग बॅलन्स (मागील बाकी) देखील सांगावी लागेल. तर वस्तू हरवली, चोरी किंवा नष्ट झाली तर त्याचाही उल्लेख करावा लागेल. याचप्रमाणे एखादी वस्तू काेणालाही भेट किंवा मोफत सँपल म्हणून दिली तर त्याचीदेखील नोंद ठेवावी लागेल.

Next Article

Recommended