आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा मान्सून चांगला झाल्यास दरकपात, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचे संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - या वर्षी मान्सूनमध्ये चांगला पाऊस पडला आणि महागाई दर कायम राहिल्यास भारतीय रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करू शकते, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. महागाई दरावर आमचे लक्ष असून यामध्ये नियमित घट होत आहे, असे सांगत, ही घट कायम राहिल्यास येत्या काळात पुन्हा व्याजदर कपातीचे संकेत त्यांनी दिले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीसाठी वॉशिंग्टन येथे आयाेजित कार्यक्रमात ते बोलत होते. यादरम्यान त्यांनी एका नियतकालिकाला मुलाखत दिली.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने याच महिन्यात व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. सध्या व्याजदर ६.५ टक्क्यांवर असून गेल्या पाच वर्षांतील हे सर्वात नीचांकी दर आहेत. सहा महिन्यांनंतर ही दरकपात करण्यात आली आहे. जानेवारी २०१५ पर्यंत रिझर्व्ह बँकेने एकूण १.५ टक्के व्याजदर कपात केली आहे. वास्तविक गुंतवणूक वाढवण्यासाठी आणखी व्याजदर कपात करण्यात यावी, अशी मागणी उद्योग जगताकडून होत आहे.

अर्थव्यवस्था मजबूत : लघु अर्थव्यवस्थेला सांभाळण्याबाबत भारतात होत असलेले प्रयत्न योग्य असल्याचे मत राजन यांनी व्यक्त केले. सध्या जगभरातील अनेक अर्थव्यवस्थांत अस्थिरता दिसत आहे. असे असताना इतर विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर चांगला असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या जागतिक पातळीवर अनेक चढ-उतार दिसत आहे. अशा स्थितीतही भारताने आपला तोटा कमी केला असल्याचे राजन यांनी यावेळी सांगितले.

मान्सूनवर निर्भरता
सलग दोन वर्षे मान्सून खराब झाल्यानंतर आता या वर्षी त्याची स्थिती कशी राहते, यावर भारतीय रिझर्व्ह बँक लक्ष ठेवत असल्याचे राजन यांनी सांगितले. आम्हाला चांगल्या मान्सूनची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वकाही योग्य राहिल्यास महागाई दर आणखी कमी होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अशा परिस्थितीत व्याजदरात कपात होण्याची पूर्ण शक्यता असल्याचे ते म्हणाले.
छायाचित्र: वॉशिंग्टनमध्ये आयोजित द्विपक्षीय बैठकीच्या वेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासमवेत अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षा जेनेट येलेन, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जेकब जे. लेव्ह, गव्हर्नर रघुराम राजन.
बातम्या आणखी आहेत...