आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एप्रिलमध्ये औद्योगिक उत्पादनात घसरण, मेक इन इंडियाला झटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सलग दोन महिन्यांच्या वाढीनंतर एप्रिल महिन्यात आयआयपी आकडेवारीत घसरण नोंदवण्यात आली आहे. आयआयपी या महिन्यात उणे ०.८ टक्क्यांवर आला आहे. मार्च महिन्यात आयआयपी दर ०.१ टक्के नोंदवण्यात आला होता. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत अद्याप स्थिरता आली नसल्याचे दिसून येते.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (सीएसओ) वतीने शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल २०१६ मध्ये उत्पादन क्षेत्रातील २२ पैकी ९ उद्योग समूहाने नकारात्मक विकास दाखवला आहे. या आकडेवारीची तुलना गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यातील अाकडेवारीसोबत करण्यात आली आहे.

ग्राहकोपयोगी वस्तूंमधील वाढ नकारात्मकतेसह ९.७ टक्के राहिली असून गेल्या वर्षी ती सकारात्मकतेसह ३.७ टक्के विक्रमी नोंदवण्यात आली असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे, तर ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तूंमध्ये गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातील वाढ ही ५.५ टक्के होती, जी या वेळी २४.९ टक्क्यांनी घसरली आहे. असे असले तरी मूलभूत वस्तूंच्या वाढीत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी वाढ झाली आहे. मूलभूत वस्तूंमधील वाढ गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात २.६ टक्के होती, त्या तुलनेत ४.८ टक्क्यांवर पोहाेचली आहे.

इलेक्ट्रिसिटीमध्ये वाढ
इलेक्ट्रिसिटी वाढीच्या आकडेवारीत सरकारने खूप चांगले काम केले आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात इलेक्ट्रिसिटी क्षेत्रात १४.६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी यामध्ये नकारात्मक आकडेवारी आली होती. याचप्रमाणे खदान क्षेत्रातदेखील १.४ टक्क्यांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे.

वाढीची अपेक्षा
उत्पादन क्षेत्रातील वाढ गेल्या वर्षीप्रमाणेच कायम राहणार असल्याचा अंदाज उद्योग संघटन फिक्कीच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला होता, अशी माहिती फिक्कीचे अध्यक्ष हर्षवर्धन निओटिया यांनी दिली. उत्पादन क्षेत्रात वाढ नोंदवण्यासाठी अद्याप वेळ लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या वतीने या क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात अाले असून या क्षेत्रात लवकरच मोठी वाढ दिसणार असल्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सर्वच क्षेत्रांतील मागणीत वाढ होणेदेखील आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

आयआयपीचा अर्थ
कोणत्याही देशाचा औद्योगिक उत्पादन सूचकांक (आयआयपी) त्या देशाची आर्थिक स्थिती कशा प्रकारची आहे, याची माहिती देतो. औद्योगिक उत्पादन सूचकांक कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेतील औद्योगिक क्षेत्रात एका विशिष्ट कालावधीतील माहिती देतो. भारतात प्रत्येक महिन्याला ही आकडेवारी जाहीर करण्यात येते. हा सूचकांक उद्योग क्षेत्रात होत असलेली वाढ तसेच घसरण याची माहिती देतो. तसेच या क्षेत्रात कशाची कमी आहे किंवा काय केले पाहिजे याविषयीदेखील अंदाज बांधला जातो. भारतातील १५ संस्थां ही अाकडेवारी गोळा करतात.

बाजारातील चढ-उतार कायम
नवी दिल्ली | आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी देखील भारतीय शेअर बाजारात चढ-उताराची स्थिती कायम दिसली. चारही बाजूंनी झालेल्या विक्रीच्या माऱ्यात भारतीय शेअर बाजार दिवसभराच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १२८ अंकाच्या घसरणीसह २६६३६ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ३३ अंकाच्या घसरणीसह ८१७० च्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात मेटल सोडल्यास सर्वच क्षेत्रातील निर्देशांकात सुमारे १.५ टक्क्याची घसरण नोंदवण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...