आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृत्व रजा देण्याकडे भारतीय कंपन्यांचा कल वाढला, मर्सरच्या अहवालातील दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वडील झाल्यानंतर आणि मूल दत्तक घेतल्यानंतर रजा देण्याबाबत जगातील टॉप-१० देशांमध्ये भारताचाही समावेश झाला आहे. भारतासह आशिया-प्रशांत क्षेत्रामध्ये ४१ टक्के कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी रजेची मर्यादा वाढवून पॅटर्निटी लीव्ह किंवा पितृत्व अवकाश देण्यास सुरुवात केली असल्याचा दावा मर्सरच्या ‘जागतिक पालक रजा अहवाल २०१६’ मध्ये करण्यात आला आहे. या अहवालानुसार जागतिक पातळीवर ३८ टक्के कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी मर्यादेपेक्षा जास्त पगारी रजा देत आहेत.

गेल्या काही वर्षांत पितृत्व रजा देण्याकडे भारतीयांचा कल वाढला असल्याचे मत या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. २०१४ मध्ये भारतातील ६० टक्के कंपन्या पितृत्व रजा देत होत्या. २०१६ मध्ये यात वाढ होऊन आता ७५ टक्के कंपन्या पितृत्व रजा देत आहेत. असे
असले तरी अनेक वर्षांपासून पाच दिवसांची सुटी देण्याच्या पद्धतीत कोणताच बदल झालेला नाही. तरीदेखील आता मोठ्या संख्येने कंपन्या कर्मचाऱ्यांना कामाच्या पहिल्याच दिवसापासून ही सुविधा देेत आहेत.

काही कंपन्या तर याबाबत जागतिक पातळीवरील कंपन्यांमध्ये अवलंबत असलेले धोरण लागू करत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जागतिक पातळीवरील धोरणाचा अवलंब करणाऱ्या १९ टक्के कंपन्या चार प्रकारच्या सुट्या देत आहेत. यामध्ये मॅटर्निटी, पॅटर्निटी, अॅडॉप्शन आणि पॅरेंटल यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ज्या कंपन्यांमध्ये जागतिक धोरणाचा अवलंब करण्यात आला नाही, त्यापैकी १२ टक्के कंपन्यांमध्ये हे नियम लागू करण्यावर विचार सुरू आहे. सर्वसामान्यपणे या रजेच्या काळातला पूर्ण पगार दिला जातो, तर काही कंपन्यांनी बिनपगारी सुटी वाढवण्याचे धोरण अवलंबले आहे.

फॅमिली केअर लिव्ह : मर्सरच्या अहवालातील निष्कर्षांनुसार जगभरात सुमारे दोन-तृतीयांश म्हणजेच ६७ टक्के कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी ‘फॅमिली केअर लिव्ह’ देत आहेत. या कुटुंबीयांमध्ये जीवनसाथी, मुले, आई-वडील, सासू-सासरे आणि भाऊ-बहिणीचा समावेश आहे. ही रजा पगारी किंवा बिनपगारीही असू शकते.

दोन वर्षांत दत्तक रजेचे प्रमाण १० % वाढले
भारतात पालक रजेप्रमाणेच मूल दत्तक घेतल्यास दत्तक रजा देण्याची पद्धत वाढली आहे. २०१४ मध्ये फक्त ३३ टक्के कंपन्या अशा प्रकारची रजा देत होती. दोन वर्षांत यामध्ये १० टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या ४३ टक्के कंपन्या अशा प्रकारची रजा देतात. अनेक कंपन्या महिला कर्मचाऱ्यांना मूल दत्तक घेतल्यास ४५ दिवसांची रजा देतात, तर काही कंपन्या मातृत्व रजेच्या बरोबरीत ९० दिवसांची रजा घेण्याची परवानगी देतात. या व्यतिरिक्त अनेक कंपन्या दत्तक रजेचा फायदा पुरुष कर्मचाऱ्यांना देखील देत आहेत.
बातम्या आणखी आहेत...