नवी दिल्ली - खराब मान्सूनमुळे खाण्यापिण्याच्या वस्तू महाग होण्याची चिंता आहे. याचदरम्यान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी चिरंतन आर्थिक विकासासाठी केंद्रीय बँकेला महागाई नियंत्रणात ठेवणे आवश्यक असल्याचे मत बुधवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
खराब मान्सून हे देशासमोरील मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे तसेच जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने हे संकट
अधिक तीव्र होत असल्याचे त्यांनी सांगितले.
राजन यांनी सांगितले की, "अच्छे दिन' फक्त आणि फक्त गुंतवणूक वाढल्याने येतील. मागील वर्षभरापासून देशात गुंतवणुकीच्या आशा वाढल्या आहेत. थांबलेल्या प्रकल्पांची संख्यादेखील कमी झाली आहे. यामुळे गंुतवणुकीबाबत सकारात्मकता वाढत असली तरी अच्छे दिन येण्यासाठी देशात प्रत्यक्ष गुंतवणूक होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या आधी देखील खराब मान्सुन असूनही महागाई नियंत्रणात होती असे ते म्हणाले.