आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • LED Light Save 128 Billions Of Nation Within 4 Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलईडी लाइटने चार वर्षांत देशाची १२८ अब्जांची बचत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एलईडी लाइटचा वापर वाढणे गरजेचे आहे. आगामी चार वर्षांत देशात सुमारे १२८ अब्ज रुपयांची (दोन अब्ज डॉलर) बचत शक्य होईल, असे केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी म्हटले आहे.

फेसबुक युजर्ससोबत गोयल यांनी गुरुवारी ऑनलाइन चर्चा केली. त्यात त्यांनी हा विश्वास व्यक्त करतानाच बचतीचे गणित मांडले. ते म्हणाले, २०१९ पर्यंत देशातील प्रत्येक घर, गल्ली, चौक उजळले पाहिजेत, असे सरकारचे ध्येय आहे. त्यासाठी प्रत्येक घरात एलईडीची व्यवस्था व्हावी म्हणून अशा प्रकारचे लाइट उपलब्ध करून दिले जातील. त्यातून अतिमहत्त्वाच्या वेळी विजेच्या मागणीत १० हजार मेगावॅटपर्यंत घट होईल.

सौरऊर्जेतून ४० हजार मेगावॅट निर्मिती शक्य : मोदी सरकारने आगामी काळात अपारंपरिक ऊर्जास्रोतांवर भर देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी साैरऊर्जेचा प्रसार करण्यासाठी योजना राबवली जाईल. सौर पॅनल सहज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यातून सात वर्षांत सुमारे ४० हजार मेगावॅट विजेची निर्मिती शक्य आहे. त्यातून दरवर्षी सुमारे १०० अब्ज युनिट विजेची बचत शक्य होईल, असा दावा ऊर्जामंत्र्यांनी केला.

२८ कोटींचा संकल्प
बचतीच्या पैशांतून २८ कोटी भारतीयांच्या घरापर्यंत वीज पोहोचवली जाईल, असे पीयूष गोयल यांनी फेसबुक युजरला सांगितले.

किंमत कमी होणार
एलईडी सर्वसामान्यांच्या आवाक्यात असाव्यात म्हणून सरकार लाइटचे दर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर छतांवर सौर पॅनल लावूनदेखील ऊर्जेची गरज भागवण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे, असे गोयल यांनी स्पष्ट केले.