आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Make In India Week: 8 Lakh Crores Investment In State Devendra Fadanvis

मेक इन इंडिया सप्ताह: राज्यात ८ लाख कोटींची गुंतवणूक - देवेंद्र फडणवीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'मेक इन इंडिया' सप्ताहाच्या पाचव्या दिवशी मेक इन इंडिया सेंटरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटी, हवाई वाहतूक, किरकोळ उद्योग, लघु व मध्यम उद्योग, परवडणारी घरे आदी क्षेत्रांतील १८ सामंजस्य करार करण्यात आले. आज झालेले आणि यापूर्वी केलेल्या सामंजस्य करारांमुळे राज्यात ८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिली.

खालापूर ग्रामस्थांचा पुढाकार : आधुनिक स्मार्ट शहर संकल्पनेच्या निर्मितीसाठी ११ गावांचे एकत्रित प्रतिनिधित्व करणाऱ्या खालापूर नगर पंचायत, कलोटे मोकाशी ग्रामपंचायत, नादोडे ग्रामपंचायत यांनी एकूण ३५५० हेक्टर जमिनीच्या लँड पुलिंगसाठी स्वेच्छेने पुढाकार घेतला आहे. या स्मार्ट शहराचा विकास नैना योजनेच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. यासंबंधीचा करार आज मुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या करारा अंतर्गत स्वेच्छेने जमीन योगदानाला प्रोत्साहन मिळणार असून नैना प्रकल्पाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. नैना योजनेअंतर्गत ६०:४० स्वेच्छेने लँड पुलिंग संकल्पनेनुसार खालापूर स्मार्ट सिटीच्या नियोजनासाठी व विकासासाठी रायगड जिल्ह्यातील खालापूर, महाड, शिरवली, निंबोडे, वणवे, नादोडे, निगडोली, कलोटे मोकाशी, कलोटे रयाती, विणेगाव आणि कंद्रोली टर्फ या प्रमुख गावांतील सहभागी भूमालकांच्या विशेष हेतू वहन कंपनीची (एसपीव्ही – स्पेशल पर्पज व्हेइकल) स्थापना करण्यात येणार आहे. या सामंजस्य करारामुळे ग्रामस्थांनी दहा हजार एकर जमीन विकासासाठी दिली आहे.

ग्रामस्थांनी पुढाकार घेतलेला हा देशातील पहिलाच प्रकल्प असून त्याच्या पूर्णत्वासाठी राज्य शासनातर्फे आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. हा प्रकल्प देशात मॉडेल ठरणार असून अन्य राज्येदेखील त्याला भेटी देतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.
विकासकांबरोबरही करार : याशिवाय सिडकोतर्फे आज नैना प्रकल्पातील विकासकांसोबतही ११ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या विकासकांमार्फत नैनामधील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात येणार आहे. यामुळे नैना प्रकल्पामध्ये गुंतवणुकीच्या व व्यापाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

सिडको व ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल इंडियामध्ये सामंजस्य करार : सुशासन व नागरिक केंद्रित प्रशासनासाठी सिडको व ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल इंडिया यांच्यासोबत आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे सिडको महामंडळ सचोटी कराराचा अवलंब करणारे राज्यातील दुसरे शासकीय महामंडळ ठरणार आहे. या सामंजस्य करारांतर्गत ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल इंडियातर्फे सिडको कर्मचारी व पुरवठादारांना सार्वजनिक खरेदी व सचोटी करार या संबंधित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय भ्रष्टाचारावर आधारित वार्षिक विक्रेता आकलन सर्वेक्षण (व्हेंडर पर्सेप्शन सर्व्हे) व दोन वेळा सिडकोच्या इंटिग्रिटी पॅक्टवर आधारित निविदांचे विश्लेषण वर्षातून करण्यात येणार आहे. यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

किरकोळ व्यापार क्षेत्रातील करार
केंद्र शासनाने किरकोळ व्यापार धोरण जाहीर केल्यानंतर राज्यामध्ये या क्षेत्रातील गुंतवणूकदारांनी मेक इन इंडिया सप्ताहाअंतर्गत गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सहा विविध कंपन्यांबरोबर आज सामंजस्य करार झाला. यामध्ये फ्युचर ग्रुप (८५० कोटी रुपये), ट्रेन्ट हायपरमार्केट (४०० कोटी), डी मार्ट (२५० कोटी), मेजर ब्रँडल (५० करोड), मेट्रो शूज (५० करोड), शॉपर्स स्टॉप (३० करोड) या कंपन्यांचा समावेश आहे.

लघु आणि मध्यम उद्योगनिर्मितीसाठी करार
लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील झालेल्या गुंतवणुकीचे आम्ही स्वागत करतो. या क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळावी, यासाठी राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून या क्षेत्रातील उद्योजकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू. राज्य शासनाने लघु, मध्यम उद्योगांना नेहमी प्राधान्यच दिले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या वेळी कोकण विभागातील सुमारे ४६ लघु, मध्यम उद्योग संस्थांसोबत राज्य शासनाचा सामंजस्य करार करण्यात आला.
छायाचित्र: पुनरुज्जीवित आणि बळकट रस्ते' या विषयावरील परिसंवादात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले.