आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या जागतिक मेरीटाइम इंडिया परिषदेचे उद्घाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारताच्या विस्तीर्ण १४,५०० किमी लांबीच्या समुद्रकिनारपट्टीला विकसित करून देशाच्या इतिहासाला साजेसा सागरी व्यापार विकसित करण्यासाठी देशाने ‘सागरमाला’ कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे भारतात सागरी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ असल्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जागतिक समुदायाला केले. मुंबईतील गोरेगाव येथील 'बॉम्बे कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर' येथे आयोजित पहिल्या 'मेरीटाइम इंडिया परिषद-२०१६'च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कोरिया हा देश सहयोगी आयोजक असणाऱ्या या तीनदिवसीय परिषदेत जगातील ४० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. भारताच्या सागरी किनारपट्टीवरील विविध घटकांमध्ये असणाऱ्या गुंतवणुकीच्या संधीला जगापुढे आणण्यासाठी जहाजबांधणी मंत्रालयाने या जागतिक परिषदेचे मुंबईत आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी, कोरिया गणराज्याचे सागरी आणि मत्स्यपालनमंत्री किम योंग-सुक, केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री पी. राधाकृष्णन, मेरीटाइम आंतरराष्ट्रीय संस्थेचे महासचिव कितॅक लीम उपस्थित होते.

‘सागरमाला’ अहवालाचे विमोचन : या वेळी आंतरराष्ट्रीय मेरीटाइम संस्थेचे महासचिव किटॅक लीम, कोरिया रिपब्लिकचे सागरी आणि मासेमारीमंत्री किम-यंग-सूक यांनीही संबोधित केले. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात भारताच्या सागरी व्यापाराचा इतिहास आणि सद्य:स्थिती दर्शवणारे ‘सागरमाला’ या अहवालाचे विमोचन करण्यात आले.

एक कोटी रोजगार
जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी या परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. भारताने जहाजबांधणी, बंदरे विकास, सागरी व्यापार या क्षेत्रात भरारी घेतली असून गेल्या दोन वर्षांत ही प्रगती ३० टक्क्यांनी वाढली असल्याचे स्पष्ट केले. बंदरांची संख्या दुप्पट करण्यात येत असून ‘सागरमाला’ या प्रकल्पांतर्गत एक कोटी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. भारताच्या सागरी किनारपट्टीवरील वाहतुकीला अधिक चालना मिळाल्यास वाहतुकीवरच्या अन्य मार्गाच्या खर्चात प्रचंड कपात होणार आहे.
छायाचित्र: गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्मृतिचिन्ह भेट देऊन स्वागत केले.