आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासदरापाठोपाठ निर्यातही पाच वर्षांत नीचांकी पातळीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- विकासदरात घट नोंदवली गेली असताना आता निर्यातीच्या आघाडीवरही भारताला मोठे अपयश पदरी पडण्याची शक्यता आहे. औद्योगिक संस्था असोचेमच्या पाहणीनुसार २०१५ - १६ मध्ये देशाची एकूण निर्यात २६५ ते २६८ अब्ज डॉलरदरम्यान राहण्याची शक्यता आहे. हा गेल्या पाच वर्षांतील सर्वात नीचांक असेल. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेतही (३१० अब्ज डॉलर) ही आकडेवारी ४५ अब्ज डॉलरने कमी आहे.

अर्थात असोचेमच्या माहितीनुसार निर्यातीमधील घट भारतीय वस्तूंची मागणी कमी झाल्याने आलेली नसून वस्तूंचे दर (कमोडिटी) घटल्याने आली आहे. त्यामुळे ही घट केवळ दरांच्या दृष्टिकोनातून आली आहे. वस्तू निर्यातीचे प्रमाण कायम आहे. जागतिक बाजारपेठेत असलेली अनिश्चितता अद्याप कायम आहे. त्यामुळे वस्तूंचा खप घटला आहे. जगभरात कच्चे तेल, धातू, कोळसा, तांबे व खाद्यपदार्थांच्या वायदे बाजारात मोठी घट दिसून येत आहे. जितका खप आहे तितकीच मागणी आहे. भविष्यासाठी म्हणून वस्तूंचा साठा करून ठेवण्याचे धाडस कुणीच दाखवायला तयार नाही. किमतीत घट होण्याचे हे प्रमुख कारण आहे.

असोचेमच्या माहितीनुसार चामड्याचे साहित्य, आभूषणे व रत्नांच्या मागणीत माेठी घट झाली आहे. त्यांचा खप कमी होणे व त्यांची आयात करणाऱ्या देशांवर असलेला दबाव त्यातून लक्षात येतो. भारतासाठी आयातीचे क्षेत्र हा रोजगारनिर्मितीचा मोठा स्रोत आहे. गेल्या महिन्यात चामड्याच्या सामानाच्या निर्यातीत जवळपास १३ टक्क्यांची घट झाली, तर तयार कपड्यांच्या निर्यातीत ७. ३२ टक्के घट दिसून अाली. त्याच वेळी सोन्याच्या किमती कमी
झाल्याने दागिने व रत्नांच्या मागणीत २. ६६ टक्कयांची किरकोळ
वाढ दिसून आली.

निर्यात घटण्याची प्रमुख कारणे
भारताच्या निर्यातीत इंजिनिअरिंग व पेट्रोलियम उत्पादनांचा मोठा वाटा आहे, परंतु अलीकडच्या काही महिन्यांत लोह, लोखंड व इतर धातूंसह कच्च्या तेलाचे दर घटले आहेत. त्यामुळे मूल्यांच्या आधारे त्यांची घट नोंदवली गेली आहे. ऑगस्टमध्ये इंजिनिअरिंग उत्पादनांची निर्यात २९ टक्के तसेच पेट्रोलियम उत्पादनांत ४७. ८८ टक्के घट झाली आहे.