वॉशिंग्टन - जागतिक अर्थव्यवस्थेतील आशेचा किरण असे भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक केले जात असले तरी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना मात्र ती काहीशी ‘आंधळ्यांच्या राज्यात हेकण्या राजा’सारखीच वाटते. जागतिक मंदीच्या स्थितीत आयएफएमसह विविध संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेला विकास दराच्या निकषावर आशेचा किरण म्हणून गौरवले आहे. त्याचे श्रेय देशाच्या वित्तीय प्रणालीला बाहेरच्या झटक्यांपासून वाचवण्यासाठी योग्य पावले उचलल्याबद्दल राजन यांच्या नेतृत्वातील रिझर्व्ह बँकेला दिले जाते. ‘आशेचा किरण’ या सिद्धांतावर राजन यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, आम्ही संतुष्ट होऊ शकू असे स्थान अजून प्राप्त करायचे आहे. आमच्याकडे एक लोकोक्ती आहे. ‘आंधळ्यांच्या राज्यात हेकणा राजा’. आमची अवस्था थोडी तशीच आहे. राजन हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत. आयएमएफ जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीबरोबरच जी-२० च्या अर्थमंत्री केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी येथे आले आहेत. डाऊ जोन्स अँड कंपनीद्वारे प्रकाशित मार्केटवॉच नियतकालिकास दिलेल्या मुलाखतीत राजन म्हणाले, परिस्थिती सुधारत आहे. गुंतवणूक वाढत आहे. व्यापक स्थैर्य आहे. अर्थव्यवस्था भलेही झटक्यापासून दूर नसेल, मात्र वाचली आहे. त्यामुळे आम्ही विकास उद्दिष्टे प्राप्त करू शकू, अशा वळणावर पुढे जात आहोत, असे आम्हाला वाटते.
बँकांत मोबाइल टू मोबाइल हस्तांतरण
गेल्याच आठवड्यात दोन बँक खात्यांदरम्यान मोबाइल टू मोबाइल हस्तांरणाचा नवीन प्लॅटफॉर्म सुरू झाला. हा सार्वजनिक आहे. तो काही अन्य कंपनीच्या मालकीचा नाही. तांत्रिक विकास होत आहे. लोकांचे जीवन सुसह्य होईल, अशी अपेक्षा आहे. काय होते ते पाहूया, असे राजन म्हणाले.