आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बियाणे स्वस्त करा, नसता देश सोडा, अमेरिकी मोन्सँटो कंपनीला केंद्र सरकारचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठी अमेरिकी बायो-टेक्नॉलॉजी कंपनी मोन्सँटो आणि भारत सरकारमध्ये बियाण्यांच्या किमतीवरून वाद वाढला आहे. कंपनी बीटी कॉटन बियाण्यांचे भाव कमी करायला तयार नसेल, तर कंपनीने देशातून गाशा गुंडाळावा, असा खरमरीत इशारा कृषी राज्यमंत्री संजीव बालियान यांनी कंपनीला दिला आहे. सरकारने सर्व बीटी कंपन्यांना बियाण्यांचे दर कमी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे कंपनीला पालन करावेच लागेल, असेही बालियान यांनी सांगितले.

मागील सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या चुकांमुळे देशातील बियाणे कंपन्यांनी मनमानी पद्धतीने दर वाढवले असून त्या चुका दुरुस्त करण्याचे काम सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. मोन्सँटोसारख्या विदेशी कंपन्यांमुळे देशांतर्गत कंपन्या दबावात आहेत. जर ही कंपनी देशातून निघून गेली, तर देशाला फरक पडत नसल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दिलासा : सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नसल्याने सरकारची समस्या वाढली आहे. यावर उपाय करण्यात येत असून भारतीय बियाणे कंपन्या मोन्सँटो या अमेरिकी कंपनीला तिच्या कापूस उत्पादन तंत्रज्ञानासाठी रॉयल्टी देतात. यात ७० टक्के कपात करण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. देशात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे ७० लाख असून त्यांच्या अनेक संघटनादेखील कार्यरत आहेत. यातीलच एक संघटना भाजपशी जोडलेली असून या संघटनेनेच बियाणे कंपन्यांनी बियाण्यांचे भाव जास्त वाढवले असल्याची तक्रार सरकारकडे केली होती.

भारतीय तंत्र विकसित करू
भारतीय कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी २०१७ पर्यंत भारतीय तंत्रज्ञान "जीएम तंत्र' विकसित होण्याची शक्यता असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
मनमानी दरवाढ
कंपन्यांच्या दरावर सरकारने अंकुश ठेवला नसल्याने कंपन्यांनी मनमानी दर वाढवले असल्यासंबंधी सरकारने चौकशी सुरू केली आहे. मात्र, कंपनीवर लावण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. कंपनी गेल्या चार दशकांपासून देशात व्यवसाय करत आहे. सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या या टीकेला उत्तर देण्यास कंपनीने नकार दिला आहे. वास्तविक, भारतात कंपनीचा खूप मोठा व्यवहार असून देश सोडण्याचा विचार कंपनी करू शकत नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले अाहे. आधीच या कंपनीला चीनमध्येदेखील अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
बातम्या आणखी आहेत...