आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा क्विंटलमागे ८०० रुपयांनी स्वस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक घटल्याने आणि परराज्यांतून मागणी वाढल्याने कांदा दरात वाढ झाली आहे. मंगळवारी (२८ जुलै) या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक भाव ४३०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला; परंतु दरात वाढ झाल्याने ग्राहकांनी कांदा खरेदीकडे पाठ फिरवली तसेच परराज्यांतूनही मागणी घटल्यामुळे बुधवारी कांद्याच्या दरात ८०० रुपयांनी घसरण होऊन कमाल दर ३५०० रुपये प्रतिक्विंटल
झाला. त्यामुळे ज्या व्यापा-यांनी व शेतक-यांनी कांदा साठवणूक केली असेल त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात उच्च प्रतीचा कांदा हा ३५ ते ४० रुपये दराने विक्री होत आहे.

यावर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने कांदा क्षेत्राचे नुकसान झाले. जो कांदा पक्व झाला होता, त्यामध्ये पाणी गेल्याने कांदा लवकर खराब झाला. त्यामुळे सुरुवातीला एप्रिल, मे महिन्यात कांदा चारशे ते पाचशे रुपये प्रतिक्विंटल
दराने विक्री झाला. ज्या भागात गारपीट आणि पाऊस झाला नाही, त्या भागातील कांद्याची प्रतही उत्तम असल्याने त्या भागातील शेतक-यांनी कांद्याची साठवणूक करून ठेवला होता. त्यामुळे त्या शेतक-यांना आर्थिक फायदा होत असला तरी बहुतांश शेतक-यांचा कांदा जमिनीत खराब झाल्याने त्यांना अजूनही शासनाकडून मदत मिळालेली नाही. सध्या लासलगाव, पिंपळगाव, सटाणा, मुंगसे, सायखेडा, येवला, दिंडोरी, कळवण, सिन्नर, नायगाव येथील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी झाल्याने गत आठवड्यापासून दरात वाढ होत हाेती.

आणखी घसरणीची शक्यता
कांद्याचे दर आवाक्याबाहेर गेल्याने ग्राहकांनी कांदा खरेदीकडे पाठ फिरवली. त्यामुळे पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारमधूनही मागणी कमी झाल्याने खरेदी केलेला कांदा तसाच पडून राहत असल्याने दरात घसरण होत आहे. दक्षिण भारतातील कांदा आॅगस्टच्या दुस-या आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता असल्याने दरात अजून घसरण होण्याची शक्यता आहे.