आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याच्या किमतीत मोठी घसरण, २० पैसे प्रतिकिलोने विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कांद्याच्या किमतीमध्ये प्रचंड घसरण होत असून काही महिन्यांपूर्वी ग्राहकांना रडवणारा कांदा आता शेतकऱ्यांना रडवत आहे. दिल्लीतील आझादपूर मंडईमध्ये कांदा पाच रुपये प्रतिकिलोवर तर मध्य प्रदेशमधील नीमच मंडईत ठोक भावात कांदा २० पैसे प्रतिकिलोने विक्री होत आहे. या वर्षी कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या नीमच येथील मंडईमध्ये विक्रमी उत्पादनामुळे कांद्याचे दर २० ते ५० पैसे प्रतिकिलोवर आले आहेत. याच प्रतीचा कांदा काही दिवसांपूर्वी २० ते ३० रुपये प्रतिकिलोच्या दराने विक्री होत होता. दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागत आहे. कांदा शेतातून मंडईपर्यंत आणण्याची किंमतदेखील शेतकऱ्यांना मिळत नाही, तर त्याच मंडईत चांगल्या प्रतीचा कांदा पाच ते सात रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.

नवरात्रामुळे मागणीत घट : रामनवमीपर्यंत नवरात्र असल्याने कांद्याची मागणी कमी झाली होती. यामुळे कांद्याचे भाव घटले असल्याचे मत अाझादपूर मंडईतील व्यावसायिक राजेंद्र गुप्ता यांनी व्यक्त केले.

येवल्यात कांद्यात घसरण
सप्ताहात येवला व अंदरसूल बाजार समिती अावारावर उन्हाळी कांद्याची आवक टिकून होती, तर बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून आले. येवल्यात कांदा तीन ते आठ रुपये प्रतिकिलोच्या दराने विक्री होत आहे. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांत व परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो व फिलिपाइन्स इ. ठिकाणी मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात एकूण कांदा आवक १७,५३४ क्विंटल झाली असून उन्हाळी कांद्याचे बाजारभाव किमान ३००, कमाल ८००, तर सरासरी ६५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते.