आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेबीकडून पीएसीएलला ७,२६९ कोटींचा दंड, आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बाजार नियंत्रक सेबीने सर्वसामान्य नागरिकांडून अवैध स्वरूपात पैसे जमा करण्याच्या प्रकरणात पीएसीएल लिमिटेड आणि त्याच्या चार संचालकांवर ७,२६९.५ कोटी रुपयांचा दंड लावला आहे. सेबीने आतापर्यंत लावलेल्या दंडापेक्षा हा सर्वात मोठा दंड आहे. कंपनीच्या संचालकांमध्ये तरलोचन सिंह, सुखदेव सिंह, गुरमीत सिंह आणि सुब्रत भट्टाचार्य यांचा समावेश आहे. हा दंड भरण्यासाठी सेबीने ४५ दिवसांची मुदत दिली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच सेबीने कंपनीची गुंतवणूक योजना (सीआयएस) वर बंदी घातली होती. तसेच तीन महिन्यांत गुंतवणूकदारांचे ४९,१०० कोटी रुपये परत देण्याचे आदेश दिले होते. कंपनीने हा पैसा १५ वर्षांत ५.८५ कोटी लोकांकडून जमा केले होते. सेबीच्या आदेशाविरोधात पीएसीएलने सिक्युरिटीज अपिलेट ट्रिब्युनल (सॅट) मध्ये अपील केले होते. मात्र, गेल्या महिन्यातच दिलेल्या निकालात सॅटने सेबीचे आदेश कायम ठेवले होते. सॅटनेदेखील तीन महिन्यांत पैसे परत करण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर आता सेबीने कंपनीवर दंड लावून कारवाई केली आहे. या प्रकरणात कंपनीने मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे जमा करून त्यांची फसवणूक केली असल्यानेच कंपनीला जास्तीत जास्त दंड लावला असल्याचे सेबीने सांगितले.

या मुळे कंपनीला एका वर्षात २,४२३ कोटींचा फायदा झाला. सेबीने अशा प्रकारच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात येणार नसल्याचे संकेत दिले आहेत. अशा पद्धतीने पैसे गोळा केल्यामुळे देशाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे काही प्रकरणांमुळे समोर आले आहे. अशा कंपन्यांनी सर्वसामान्य माणसांची लूट केल्यामुळेच त्यांना असा दंड लावण्याची आवश्यकता आहे.

परवानगी घेतली नाही
सेबीच्या कायद्यानुसार कोणत्याही कंपनीला ५० लाेकांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करायचे असल्यास, त्यासाठी आधी सेबीची परवानगी घेणे आवश्यक आहे. पीएसपीएलने असे केलेले नाही.

का झाली कारवाई
कंपनीने शेतीची जमीन खरेदी करून त्याच्या विकासाच्या नावावर अवैध योजना चालवल्या. तसेच सर्वसामान्य लोकांकडून पैसे घेतले. त्या बदल्यांत लोकांना मोठ्या परताव्याचे प्रलोभन देण्यात आले होते.

नफ्याच्या तिप्पट दंड
- नियमाप्रमाणे सेबी २५ कोटी किंवा जमा केलेल्या पैशाच्या तिप्पट दंड लावू शकते.
- पीएसीएलने २,४२३ कोटी रुपये कमवले आहेत. यावर तिप्पट दंड लावण्यात आला.