नवी दिल्ली - इराणमधून कच्च्या तेलाचा पुरवठा वाढला अाहे. तसेच चीनमध्ये सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे जुलै महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती १५ टक्के कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाच्या उतरत्या किमती पाहिल्यास येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत १ ते १.५ रुपये प्रतिलिटरची कपात होण्याची शक्यता आहे.
यामुळे उद्योगजगतालादेखील फायदा होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी होणे हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी उपयोगी असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे. या आधी १५ जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये २ रुपयांची समाधानकारक कपात करण्यात आली होती. एका महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती १५ टक्के कमी झाल्या आहेत.
सध्या देशात कच्चे तेल ३१०० रुपये प्रतिबॅरल विकले जात आहे. जागतिक बाजारात आवक वाढल्याने किमती कमी होत असल्याचे इंडियन अाॅइल काॅर्पाेरेशनचे माजी अध्यक्ष बी. एम. बन्सल यांनी सांगितले. तेल कंपन्या देखील पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करतील.