आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाळी १५ दिवसांत स्वस्त होतील, साठवणूक निर्बंध काढण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील खासगी आयातदारांनी २५ लाख टन डाळींची आयात केली असून त्यापैकी अडीच लाख टन डाळी गेल्या पाच ते सात दिवसांत अगोदरच मुंबई बंदरामध्ये आल्या आहेत. परंतु केंद्र सरकारने घातलेल्या साठवणूक निर्बंधांमुळे या डाळी बाजारात येण्यामध्ये अडचण निर्माण होणार आहे. हे निर्बंध शिथिल झाले तर या आयात करण्यात आलेल्या डाळींमुळे बाजारातील पुरवठा सुरळीत होऊन पंधरा दिवसांत डाळींच्या किमती कमी होतील, असा विश्वास इंडिया पल्सेस अँड ग्रेन असोसिएशन या संस्थेने व्यक्त केला आहे.

वास्तविक देशाच्या एकूण आयातीपैकी ५० टक्के आयात मुंबई बंदरात होते व येथून हा माल पुढे देशभरात वितरित केला जातो. केंद्र सरकारने साठवणुकीचे प्रमाण निश्चित केल्यामुळे कायदेशीररीत्या हा माल बाजारात सध्या उपलब्ध होऊ शकत नाही. आयातदारांनी २५ लाख टन डाळींची आयात करण्याचे कंत्राट दिलेले असून या डाळी १५ ऑक्टोबर ते ३१ जानेवारी या कालावधीत बंदरात येतील. या डाळी बाजारात आल्यास तुटवडा बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकेल, असे असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण डोंगरे यांनी सांगितले. साठवणुकीवरील निर्बंध शिथिल न झाल्यास त्याचा डाळीच्या या आयातीला फटका बसून तुटवड्याचे प्रमाण आणखी वाढण्याची भीती आहे. बाजारात पुरेशा प्रमाणात डाळ उपलब्ध झाल्यास सध्याच्या परिस्थितीत बदल होऊ शकेल.त्यादृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारकडे निर्बंध सैल करण्याची मागणी केली असल्याकडे डोंगरे यांनी लक्ष वेधले.

गेल्या सहा महिन्यांत झालेल्या १७ लाख टन डाळ आयातीच्या तुलनेत आताचे आयातीचे प्रमाण जास्त आहे. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये चणा आणि मसूरचे चांगले उत्पादन झाले आहे. आयात करण्यात येत असलेली २५ लाख टन डाळी पुढील तीन महिन्यांत बाजारात येतील. त्यानंतर रब्बी पिकाचा हंगाम सुरू होणार असल्यामुळे डाळींचा तुटवडा कमी होऊन किमतीत सुधारणा होईल असा विश्वास असोसिएशनचे उपाध्यक्ष बिमल कोठारी यांनी व्यक्त केला.

अन्य डाळी स्वस्त
जागतिक तसेच स्थानिक बाजारातील तुटवड्यामुळे तूर आणि उडदाच्या डाळीच्या किमती भडकल्या आहेत. पण वाटाणा (२५ रु. किलो), चणा (५० रु.), मसूर (६५ रु.) या अन्य डाळी वाजवी भावात मिळत असल्याचा दावा डोंगरे यांनी केला.
पुढे वाचा..अन्य डाळी स्वस्त