आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तर 'मेड इन इंडिया' होईल 'मॅड इन इंडिया': राजीव बजाज, उद्योगांची अडचण वाढली असल्याचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील नवसंकल्पना, नवनिर्मिती गुदमरल्याने केंद्राचे मेड इन इंडिया कार्यक्रम मॅड इन इंडिया बनले असल्याची  विखारी टीका बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी गुरुवारी केली. प्रत्येक नवसंकल्पनात्मक निर्मितीसाठी देशात सरकारची परवानगी आणि न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागते असल्याने मेक इन इंडिया आता मॅड इन इंडिया झाले आहे.
 
मागील पाच वर्षांपासून बजाज ऑटो आपल्या चारचाकीला परवानगी मिळण्याची वाट पाहत असल्याचे बजाज यांनी स्पष्ट केले.  मुंबईत माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योगातील दिग्गजांच्या संमेलनात राजीव बजाज यांनी ही भूमिका मांडली. 

ते म्हणाले, बजाज ऑटोने तयार केलेल्या चारचाकीची (क्वाड्रिसायकल) युरोप, आशिया आणि लॅटीन अमेरिकेतील अनेक देशांत सध्या विक्री सुरू आहे. अत्यंत इंधन किफायतशीर, पर्यावरणपूरक, सुरक्षित असलेल्या या चारचाकीला भारत या एकमेव देशात मात्र परवानगी नसल्याचे आश्चर्य वाटते. शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत सुलभ असणारी ही क्वाड्रिसायकल मात्र परवानगीच्या अडथळ्याच्या गर्तेत अडकली आहे.
 
बऱ्याच जणांना वाटते की दुचाकी -मोटारसायकल धोकादायक आहे. बजाज ऑटो ही कारविरोधी कंपनी असल्याचा समज अनेकांचा झाला आहे. मात्र, तसे नाही. कार जास्त मोठी असते, ती प्रदूषणही खूप करते. त्यावर पर्याय म्हणून क्वाड्रिसायकल आणली आहे. मात्र, त्यात सरकारने खोडा घातला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 
 
मोटारसायकलवरच भर
राजीव बजाज म्हणाले, आगामी काळात बजाज ऑटोचा जास्तीत जास्त भर मोटारसायकल निर्मितीवरच राहील. जगाच्या दुचाकी बाजारपेठेत आमचा वाटा केवळ १० टक्के आहे, तो ३० टक्क्यांपर्यंत नेण्याचा निश्चित प्रयत्न राहील. आपले लक्ष्य नेहमी अर्जुनाप्रमाणे असावे. सध्या आम्ही जगातील तीनचाकी वाहन निर्मितीत अव्वलस्थानी आहोत. माझ्या लहानपणी लोक तीनचाकीवरून मला हिणवायचे, हसायचे. म्हणून   क्वाड्रिसायकल ही नवी श्रेणी आणली.   
 
सचिनला ‘बेसबॉल’चा सल्ला
स्कूटर व्यवसाय पुन्हा सुरू करण्याला बजाज यांनी स्पष्ट शद्बांत नकार दिला. हे सचिन तेंडुलकरला बेसबॉल खेळण्याचा सल्ला देण्यासारखेच असल्याचे ते म्हणाले. या खेळातही बॅट आणि बॉलचा वापर हाेतो. आपण आता जागतिक पातळीवरील कंपनी बनण्याची तयारी करत आहोत. त्यामुळे आता आपल्यासाठी ‘परसेप्शन’ अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...