आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सहकारी बँकेकडून लाभांशापोटी १० कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकेकाळी कोट्यवधींच्या तोट्यामुळे डबघाईला आलेल्या राज्य सहकारी बँकेने नफा कमावण्याची हॅटट्रिक केली असून यावर्षी कमावलेल्या नफ्यापैकी १० कोटींचा लाभांशही राज्य सरकारला बँकेने दिला आहे.कोट्यवधींचे घोटाळे आणि बुडीत कर्ज यामुळे या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून तिच्यावर प्रशासक नेमण्याची पाळी राज्य सरकारवर आली होती. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या बँकेवर प्रशासक मंडळ नेमल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये प्रचंड संघर्षही झाला होता. मात्र राजकीय हस्तक्षेप संपल्यानंतर या बँकेने पुन्हा गरुड भरारी घेतली आहे. सलग तिसऱ्या वर्षी या बँकेने नफा कमावला आहे. २०१२-१३ मध्ये ही बँक पहिल्यांदा नफ्यात आली आणि सुमारे ३९१ कोटींचा नफा या बँकेने कमावला. २०१३-१४ मध्ये या बँकेने ४०१ कोटींचा नफा कमावला तर २०१४-१५ या वर्षात बँकेने ४१२ कोटींचा नफा कमावला.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे राज्य शासनाचे १०० कोटींचे भागभांडवल आहे. बॅंकेस ३१ मार्च २०१५ अखेर ४१२ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. बॅंकेने १० टक्के लाभांश जाहीर केला आहे.
राज्य शासनाचे बँकेकडे जमा असलेल्या भागभांडवलापोटी १० टक्के लाभांशाप्रमाणे १० कोटींचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी सुपूर्द करण्यात आला. सहकार, पणन, वस्त्रोद्योग आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील, आमदार बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, बँकेचे प्रशासक डॉ. एम. एल. सुखदेवे, व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड आदी या वेळी उपस्थित होते.