आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन मित्रांना सायकलिंगची आवड, दोन वर्षांपूर्वी बनवला सायकल स्टार्टअप, आता बनेल कंपनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - इच्छा तिथे मार्ग अशी म्हण प्रचलित आहे. बीजिंग विद्यापीठातील तीन विद्यार्थ्यांना सायकलिंगची हौस होती. त्यांनी फक्त दोनच वर्षांपूर्वी सायकल शेअरिंगसाठी “ओफो बायसिकल’ नावाने स्टार्टअप सुरू केले होते. आता हे स्टार्टअप मोठ्या कंपनीत रूपांतरित होणार आहे. उबेर, ओलासारखी चीनमधील सर्वात मोठी टॅक्सी कॅब कंपनी असलेल्या “दीदी चुशिंग’ने यामध्ये मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. मात्र, ही गुंतवणूक कितीची असेल याचा खुलासा केलेला नाही.

बीजिंग विद्यापीठाचे विद्यार्थी - झांग सिदिंग, दाई वेई आणि शू दोंग यांनी मिळून २०१४ मध्ये स्मार्टफोनवर आधारित सायकल शेअरिंग अॅप “ओफो’ची सुरुवात केली होती. ज्या ठिकाणी येण्या-जाण्याची सुविधा मर्यादेत असते अशा महाविद्यालय, विद्यापीठासारख्या क्षेत्रामध्ये त्यांनी ही सेवा सुरू केली.

या अॅपच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्ती किंवा विद्यार्थी सायकल बुक करून तिचा वापर करून, जेथे जायचे असेल तेथे सायकल साेडू शकतात. काही महिन्यातच ही सेवा इतकी लोकप्रिय झाली की, बीजिंग विद्यापीठापासून ते चीनमधील अनेक शहरांतील महाविद्यालयांच्या परिसरात ओफोच्या पिवळ्या रंगाच्या सायकली दिसू लागल्या. दीदी चुशिंगने ओफो बायसिकलसोबत उत्पादन विकास, तंत्रज्ञान, डाटा आणि बिझनेस ऑपरेशन वाढवण्यासंबधी करार केला आहे. आता दीदी चुशिंगच्या अॅपच्या माध्यमातूनही टॅक्सी, कार व्यतिरिक्त सायकलदेखील बुक करता येईल.

शिक्षण सुरू असतानाच झाली सुरुवात
झांगसिदिंग, दाई वेई आणि शू दोंग हे तिघेही बीजिंग विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली. या तिघांनाही सायकलिंग करण्याची आवड होती. या तिघांमध्ये या आवडीचाच वापर करून व्यवसाय सुरू करण्याचा सर्वात आधी विचार देई वेई यांनी व्यक्त केला होता. खूप विचार केल्यानंतर त्यांनी सायकल विकत घेतली तसेच काही जुन्या सायकली मिळवून एप्रिल २०१४ मध्ये विद्यापीठ परिसरातच ओफो बायसिकलची सुरुवात केली होती. काही महिन्यांतच त्यांना विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळू लागला.

अॅपवर सायकलची बुकिंग
‘ओफो’मोबाइल अॅप डाऊनलोड केल्यानंतर कोणताही व्यक्ती या अॅपच्या माध्यमातून टॅक्सीप्रमाणे सायकल बुक करू शकतो. कोणत्याही जागी जायचे असेल तर उपलब्ध असलेल्या सायकलचा पासवर्ड क्रमांक त्याला अॅपच्या माध्यमातून मिळतो. या पासवर्डमुळे सायकलचा लॉक उघडतो आणि इच्छितस्थळी पोहोचल्यानंतर पुन्हा सायकल लॉक करून ठेवून देतो. त्यानंतर इतर कोणी सायकल बुक केल्यास त्याला या सायकलचा वापर करता येतो. त्यासाठी अॅपच्या माध्यमातून सायकलचा पासवर्ड घ्यावा लागेल.
बातम्या आणखी आहेत...