आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी, भाज्यांची मंदी सुरूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - काही दिवसांपासून मुंबईचे व्यापारी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन टोमॅटोची खरेदी करू लागल्याने येत्या आठवडाभरात त्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दुष्काळ असला तरी निवडक सोडल्या तर बहुतांश भाज्यांचा सुकाळ आहे. महिनाभर तरी भाज्यांचे दर कमी राहण्याचा अंदाज येथील व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

लातूर जिल्ह्याला पाण्याची भ्रांत असली तरी भालीपाल्याचे उत्पादन मात्र चांगले निघत आहे. भीषण पाणीटंचाईच्या काळातही दिवसाला सुमारे सात टन भाज्या विक्रीला येत आहेत. परिणामी, त्याचे घसरलेले दर महिनाभरापासून कायम आहेत. भांडवलदार व मोठे शेतकरीही भाज्यांचे उत्पादन घेऊ लागले आहेत. त्यांनी बारमाही िपकांऐवजी कमी वेळेत येणाऱ्या व कमी पाण्यात येणाऱ्या भाज्यांकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे उसासारखे जास्त पाणी लागणारे पीक कमी झाले आहे. भूगर्भातील पाणीपातळी खोल गेली असली तरी दिवसभरात तासभर विद्युत पंप चालेल, असे काही शेतकरी आहेत. त्यांच्याकडून भाज्यांचे उत्पादन सुरू आहे. त्यातच मागणीही कमी असल्याने भाव पडले आहेत. येथे येणारा माल स्थानिक आणि शेजारील जिल्ह्यातील आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुका टोमॅटोचे आगार समजला जातो. परिणामी, मुंबईतील व्यापारी चाकूर तालुक्यात दाखल झाले असून ते वडवळ, जानवळ, लातूर रोड भागात फिरून शेतकऱ्यांकडून टोमॅटोची खरेदी करू लागले आहेत. त्यांच्याकडून दिवसभरात तीन ते चार ट्रक टाेमॅटो खरेदी करण्यात येत आहेत. निवडक भाज्या महाग हिरवी मिरची, भेंडी, गवार आणि दोडक्याचे दर वाढलेले कायम आहेत. हिरवी मिरची कर्नाटकातील बेळगाव भागातून येत आहे.

टोमॅटोचे दर वाढतील
भाज्यांची वाढलेली आवक कायम आणि मागणी कमीच आहे. त्यामुळे दर घसरले आहेत. महिनाभर असेच चित्र राहण्याची शक्यता आहे. मुंबईचे व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करू लागल्याने त्याचे दर वाढतील. - विश्वनाथ झांबरे, उपाध्यक्ष, भाजीपाला आडत असो. लातूर