आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुर्कस्तानची गुंतवणूक, औरंगाबादलाच पसंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पायाभूत सुविधांचे जाळे व तांत्रिक कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने औरंगाबादेत जास्तीत जास्त गुंतवणूक यावी आणि उद्योग उभारले जावेत असा प्रयत्न उद्योग विभागातर्फे सुरू आहे. मंत्रालयात बुधवारी तुर्कस्तानच्या राजदूतांबरोबर झालेल्या बैठकीत याचाच प्रत्यय आला. तुर्कस्तान सरकारने औरंगाबादेत जास्तीत जास्त गुंतवणूक करावी, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सुचवले.

राज्यात उद्योगवाढीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री देसाई यांनी चालवलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. राज्यात गुंतवणूक न केलेले अनेक देश आता पुढे येत आहेत. तुर्कस्तानची इच्छा त्या देशाचे राजदूत सब्री एरगन यांनी बोलून दाखवली, असे सांगून देसाई म्हणाले की, शिक्षण, आरोग्य, पर्यटन व हाउसिंगच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास तुर्कस्तान तयार आहे. मुंबईसह मोठ्या शहरांत जागांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे उद्योगवाढीसाठी सुविधा उपलब्ध असलेल्या शहरांचा विकास करण्याची आमची योजना आहे. या दृष्टीने औरंगाबाद योग्य ठरते. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) होत असल्याने तेथे उद्योगांसाठी चांगली संधी असल्याचे आम्ही एरिगन यांना सांगितले. औरंगाबादेत जागांचे भाव कमी आहेत. त्यामुळे तुर्कस्तानच्या राजदूतांनीही या प्रस्तावावर विचार करू असे म्हटल्याचे देसाई म्हणाले.

तुर्कस्तानात टेक्स्टाइल उद्योग मोठा आहे. अमरावती आणि नागपुरात आपण टेक्स्टाइल पार्क उभारत आहोत. यासाठी तुर्कस्तान गुंतवणूक करणार आहे. मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनी तुर्कस्तानला येऊन त्यांच्या पंतप्रधानांची भेट घेण्याचे आमंत्रणही एरिगन यांनी या वेळी दिले.
दै. "दिव्य मराठी'च्या कार्यक्रमात देसाई यांनी दिले होते आश्वासन : ‘दिव्य मराठी’च्या अलीकडेच झालेल्या बिझनेस एक्सलन्स अवाॅर्ड वितरण समारंभासाठी उद्योगमंत्री देसाई औरंगाबादेत आले होते. तेव्हाही त्यांनी नव्या गुंतवणुकीसाठी औरंगाबादलाच आपली पसंती असल्याचे म्हटले होते, हे विशेष.

स्मार्ट सिटीसाठी इच्छुक
देशात १०० स्मार्ट सिटी उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी स्वित्झर्लंड, द. कोरिया, जर्मनी आणि सिंगापूरच्या अधिका-यांनीही उद्योगमंत्री देसाई यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. या चर्चेत स्मार्ट सिटी उभारण्यासाठी कशा पद्धतीने मदत करू शकतात याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.