आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टि्वनस्टार राज्यात गुंतवणार पाच टप्प्यांत ६८ हजार कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वेदांता समूहाशी निगडित टि्वनस्टार डिस्प्ले टेक्नॉलॉजीज महाराष्ट्रात १० अब्ज डॉलरची (६८ हजार कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. प्रख्यात अब्जोपती आणि वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी शनिवारी ही माहिती दिली.
मुंबई येथे शनिवारपासून सुरू झालेल्या मेक इन इंडिया सप्ताहात या संदर्भात कंपनी आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. ही गुंतवणूक
पाच टप्प्यांत होणार असून या माध्यमातून ५० हजार जणांना रोजगाराच्या संधीदेखील मिळणार आहेत. टि्वनस्टार महाराष्ट्रात एलसीडी पॅनेल निर्मितीचा प्रकल्प उभा करणार आहे.
टि्वनस्टार डिस्प्ले टेक्नॉलॉजी ही वेदांता समूह व स्टरलाइट टेक्नॉलाॅजीज या कंपन्यांशी संबंधित असून वोल्कॅन इन्व्हेस्टमेंट ही या सर्व कंपन्यांची पालक कंपनी आहे. या बाबत माहिती देताना अग्रवाल यांनी सांगितले की, देशात सध्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि नेट झिरो इलेक्ट्रॉनिक्स इम्पोर्ट २०२० हे अभियान सुरू आहे. आम्ही या अभियानाचा भाग म्हणून ही गुंतवणूक करणार आहोत. मुंबईत सुरू झालेल्या मेक इन इंडिया सप्ताहात महाराष्ट्र सरकारशी या संबंधीचा सामंजस्य करार होणार आहे.

२०१८ पासून उत्पादन सुरू
अग्रवाल यांनी सांगितले, या करारानुसार टि्वनस्टार टेक्नॉलॉजीज महाराष्ट्रात एलसीडी पॅनेल फॅबचा प्रकल्प उभा करणार आहे. त्यासाठी पाच टप्प्यांत सुमारे ६८ हजार कोटी रुपयांची गुंतणूक करणार आहे. महाराष्ट्रात यासाठी दोन ठिकाणांची निवड करण्यात आली अाहे. सुमारे ३०० एकरांवर उभारण्यात येणारा हा भारतातील पहिला एलसीडी निर्मिती प्रकल्प राहील. या प्रकल्पातून २०१८ पासून उत्पादन सुरू होणे अपेक्षित असून यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या ३० हजार जणांना रोजगार मिळणार आहे.