आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीएच्या शेवटच्या वर्षात नोकऱ्यांत वाढ, २०१३-१४ मध्ये नवीन गुंतवणुकीचे प्रमाण घसरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात २०१३-१४ मध्ये नोकऱ्यांत ४.४ टक्के वाढ झाली, तर याच काळात उद्योग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात १४.०५ टक्के वाढ झाली. बुधवारी २०१३-१४ चा वार्षिक औद्योगिक अहवाल सरकारने जाहीर केला, त्यात या बाबी समोर आल्या आहेत. त्या काळात नवीन गुंतवणूक ठप्प झाल्याचे तसेच भांडवल निर्मिती घसरल्याचेही अहवालात म्हटले आहे.

केंद्रातील सत्तास्थानी सध्याचे मोदी सरकार येण्याच्या एक वर्षापूर्वीच्या कालावधीचा हा अहवाल असून यूपीए सरकारच्या अखेरच्या वर्षातील औद्योगिक क्षेत्रातील कामगिरी या अहवालावरून समोर आली आहे. अहवालानुसार २०१३-१४ या ;वर्षभरात वेगवेगळ्या उद्योगांत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १.३५ कोटी होती. त्यापूर्वीच्या म्हणजेच २०१२-१३ या वर्षात हेच प्रमाण १.२९ कोटी होते. याच काळात नोकऱ्यांचे प्रमाण ४.४ टक्क्यांनी वाढले. २०१३-१४ या काळात उद्योग क्षेत्रातील कामगारांच्या वेतनात १४.०५ टक्के वाढ होऊन ते १.२६ कोटीवर पोहोचले. तत्पूर्वीच्या वर्षात हेच प्रमाण १.१० कोटी रुपये होते. दरम्यान, गुंतवणुकीचा कल स्पष्ट करणारा एकूण भांडवल निर्मितीचा वेग २०१३-१४ मध्ये ५.६२ टक्क्यांनी घसरून ४.२१ लाख कोटींवर आला. तर नवीन गुंतवणुकीचे द्योतक असणाऱ्या मुदतीची भांडवल निर्मिती २०१२-१३ मधील ३.५७ लाख कोटींवरून घसरून २०१३-१४ मध्ये ३.५३ लाख कोटींवर आली. कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण २०१३-१४ मध्ये ४.४४ लाख कोटी राहिले, ते २०११-१२ मध्ये ३.७९ लाख कोटी रुपये होते.