आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्शुरन्स: योग्य विमा संरक्षणाने वित्तीय जोखीम कमी करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या जीवनातील विविध जोखमींकडे दुर्लक्ष करून, कमी करून, त्यापासून दूर राहून किंवा तिला दुसरीकडे वळवून त्याचे व्यवस्थापन करता येते. उदाहरणार्थ - जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा अपघाताची जोखीम असते. अत्यंत अपघातजन्य स्थळी जाण्याचे टाळत आपण ही जोखीम कमी करू शकतो. या जोखमीकडे दुर्लक्ष करत आपण पुढचा प्रवास करू शकतो. प्रवासाची स्थळे कमी करूनही जोखीम कमी करता येते. प्रवास टाळून धोका टाळता येतो किंवा योग्य तो व्यक्तिगत अपघात विमा संरक्षण घेऊन वित्तीय जोखीम विमा कंपनीवर टाकता येते.
आपली एकूण विम्याची गरज किती आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला काही मुद्दय़ांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सर्वप्रथम आपली आर्थिक स्थिती काय आहे ते बारकाईने तपासा. विमा उतरवण्यापूर्वी आपत्कालीन फंडासाठी काही पैसे राखून ठेवण्याची गरजही भासू शकते. त्यानंतर आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचा आढावा घ्या. यासाठी विविध आर्थिक विषयांच्या संकेतस्थळांवर उपलब्ध असलेल्या रिस्क असेसमेंट साधनांची मदत घेता येईल. यातून जोखीम घेण्याच्या क्षमतेचा चांगला अंदाज येईल.
समजा, एखाद्याच्या पश्चात त्याचे कुटुंब जीवनशैली, आर्थिक लक्ष्यात कपात करतील आणि कमी पैशात आपली गरज भागवतील असे ज्याला वाटते त्याने कमी विमा संरक्षण घेतले तरी चालते. दुसरी बाजू सांगायची झाली तर समजा तुम्ही परंपरावादी आहात, तर पुरेसे विमा संरक्षण असावे असे वाटून तो विमा संरक्षण घेईल. त्यामुळे त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक चणचण भासणार नाही. याबाबत प्रत्येक व्यक्तीचा वेगवगेळा दृष्टिकोन असू शकतो. मात्र, जेव्हा आपण विमा संरक्षणाबाबत विचार करता तेव्हा आयुर्विमा आधी की आरोग्य विमा आधी, असा प्रश्न निर्माण होतो. आरोग्य विमा आधी घेणे केव्हाही योग्य. कारण मृत्यूपेक्षा रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता जास्त असते. तसेच वाढत्या वयानुसार चांगला आरोग्य विमा मिळणेही अवघड होऊन बसते. वाढत्या वयाबरोबरच आयुर्विमा संरक्षणासाठी जास्त प्रीमियम द्यावा लागतो हे कायम लक्षात ठेवा.
आरोग्य विमा खरेदीवेळी लक्षात घ्यायच्या बाबी : 1. आपल्याला मिळणार्‍या वेतनाच्या रकमेच्या 10 टक्के एवढीच रक्कम सर्व प्रकारच्या विम्यावर खर्च व्हायला हवी. 2. आपल्या सध्याच्या वैद्यकीय स्थितीनुसार प्रत्येकाला विविध संरक्षणासाठी वेगवेगळा पवित्रा अवलंब करावा लागतो. 3. समजा तुम्ही प्राथमिक आरोग्य संरक्षण घेऊ इच्छिता तेव्हा 10 लाखांचे विमा संरक्षण घेणे उचित राहील. समजा सेकंडरी आरोग्य विमा संरक्षण घ्यायचे असेल तर पाच लाखांचे संरक्षण घेऊ शकतो. 4. जी पॉलिसी चांगला नो क्लेम बोनस देते अशाच पॉलिसीची निवड करा. 5. योग्य आरोग्य विमा संरक्षणासाठी विविध आर्थिक पोर्टलवर असणार्‍या परीक्षणाचा तुलनात्मक अभ्यास करा.
जेव्हा आरोग्य विमा घ्याल तेव्हा आयुर्विमा घेण्यात विलंब करू नका. आयुर्विमा आणि आरोग्य संरक्षण हे आपल्या कोअर इन्शुरन्स कव्हरचा भाग असायलाच हवेत. ते घेतल्यानंतरच अपघात, क्रिटिकल इलनेस, व्हॉस्पिटल कॅश आणि एम्प्लॉयमेंट आदी विमा संरक्षण घेण्याबाबत विचार करावा.
विविध प्रकारचे विमा संरक्षण घ्यायचे असेल तर ते वेगवेगळ्या महिन्यात घ्या. त्यामुळे हप्त्याची रक्कम व्यवस्थित वाटली जाईल. विविध संरक्षणांतर्गत मिळणार्‍या सुविधांकडे लक्ष द्या. दीर्घकाळाची आरोग्य विमा योजना निवडू नका. कारण अनेक नव्या कंपन्या त्यापेक्षा चांगल्या सुविधांची पॉलिसी आणू शकतात.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.

rohit.shah@dainikbhaskargroup.com