आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Before The Insurence Activation Identify The Risk

विमा उतरवण्यापूर्वी जोखीम ओळखा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जोखमीचे अनेक प्रकार असू शकतात. जोखीम आर्थिक तसेच आर्थिकेतरही असू शकते. आर्थिक जोखमीला संरक्षण देणारे आयुर्विमा हे एक साधन आहे. मात्र, यासाठी विमाधारकाला आपल्या कुटुंबाच्या जोखमीबाबत माहिती असणे आवश्यक आहे. हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया. मेरानी कुटुंबाचा विचार करू. या कुटुंबात सहा सदस्य आहेत. पिता राम मेरानी (70) निवृत्त आहेत. आई रीता (64) गृहिणी आहेत. त्यांचा मुलगा व सून राकेश (40) आणि माया (36) आहेत. नातू जय (8) आणि नात मिता (4) आहेत. राकेश आणि माया दोघेही खासगी क्षेत्रात नोकरी करतात. त्यांचे मासिक उत्पन्न 70 हजार रुपये आहे. त्यांनी 50 लाख रुपयांचे होमलोन घेतले असून हे कुटुंब त्याच घरात राहते. सर्वप्रथम आपण जोखमीच्या बाबी लक्षात घेऊ. या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडली व तिला रुग्णालयात दाखल करावे लागले तर उपचारासाठी मोठ्या रकमेची गरज लागेल. रुग्णालयात दाखल होण्याचे कारण आजार किंवा अपघात असू शकते. अपघातात कायमचे किंवा तात्पुरते अपंगत्वही येऊ शकते.

जर राकेश किंवा माया यांच्यापैकी एक जणास अपंगत्व आले तर उत्पन्नावर परिणाम होईल. जर यापैकी एकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तरीही उत्पन्नाचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे कुटुंबाची जीवनशैली आणि भविष्यातील योजनांवर परिणाम होऊ शकतो. त्यात मुलांचे शिक्षणही आलेच. कुटुंबाकडे मोठी मालमत्ता म्हणून घर आहे. आग लागल्यामुळे याचे नुकसान होऊ शकते. घरातील मौल्यवान वस्तूंची चोरी होऊ शकते. या दांपत्यावर सर्वात मोठी जबाबदारी होमलोनची आहे. या सर्व जोखमीच्या बाबी लक्षात घेऊन राकेश आणि माया यांनी आर्थिक नुकसानीचा अंदाज घेतला पाहिजे. एकदा त्याचा हिशेब केल्यानंतर, या जोखमी कशा टाळता येतील किंवा कमी कशा करता येतील हे पाहावे लागेल. यातून न टाळता येणा-या जोखमी विमा कंपन्यांकडून संरक्षित करून घेणे व त्यासाठी किती रक्कम लागते हे त्यांना पाहावे लागेल.

मेरानी कुटुंब आपल्याकडील काही रोख रक्कम फ्लेक्सी मुदत ठेवी आणि लिक्विड म्युच्युअल फंडात गुंतवू शकतात. यामुळे संकटकाळात जोखमीची पूर्तता करता येईल. तर आरोग्य, अपघात, अपंगत्वासारख्या जोखमी त्यांना विम्याद्वारे संरक्षित करता येतील. राकेश आणि माया माता-पित्यासाठी वेगवेगळ्या, तर स्वत:साठी तसेच मुलांसाठी फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेऊ शकतात. माता-पित्यासाठी प्रीमियम थोडा जास्त असेल व संरक्षित रक्कमही कमी मिळण्याची शक्यता आहे. माता-पित्याच्या आरोग्यविषयक समस्यांसाठी ते पैसे वेगळे काढून ठेवू शकतात. आरोग्य चांगले राखल्यास आरोग्य विमा व त्यासाठीचा प्रीमियम वाढण्याची शक्यता कमी होईल.

राकेश आणि माया यांच्या उत्पन्नावर पूर्ण कुटुंब अवलंबून आहे. त्यासाठी आयुर्विमा आणि डिसेबिलिटी बेनिफिटसह पर्सनल अ‍ॅक्सिडेंट विमा उतरवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांना आयुर्विम्याशिवाय होमलोनची जबाबदारी संरक्षित करणे गरजेचे आहे. घरातील सध्याचे साहित्य आणि ते बदलण्याचा खर्चही विचारात घेता त्यांना कॉम्प्रेहेन्सिव्ह होम आणि कंटेट्स विमा पॉलिसी घ्यावी की नको याचा निर्णय घेऊ शकतात. मुलांचे उत्पन्न आणि जबाबदारी नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी केवळ आरोग्य विमा उतरवणे उचित राहील.
याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाने आपली जोखीम ओळखणे व त्याची समीक्षा करणे आवश्यक आहे. त्यामुळे सुरक्षित उपाय शोधणे सोपे होईल.

लेखिका सर्टिफाइड फायन्शियल प्लॅनर असून द फायन्शियल प्लॅनर्स गिल्ड इंडियाच्या सदस्य आहेत.
kiran.telang@dainikbhaskargroup.com