आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्यात वाढल्याने व्यापार तूट नियंत्रणात येण्याची चिन्हे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - निर्यातीची चढती कमान आणि आयातीमधील घसरण यामुळे सप्टेंबर महिन्यात व्यापार तूट 6.76 अब्ज अशा तब्बल 30 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. व्यापार तूट नियंत्रणात आल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून चलन बाजारपेठेत घरंगळणा-या रुपयाला स्थिरता मिळण्यास मदत होऊ शकणार आहे. यंदाच्या वर्षातील 325 अब्ज डॉलरच्या निर्यातीचे लक्ष्य गाठण्याचा विश्वास वाणिज्य सचिवांनी व्यक्त केला आहे.


सप्टेंबरमध्ये आयात लक्षणीय 18.1 टक्क्यांनी कमी झाली असून त्या उलट निर्यातीमध्ये 11.35 टक्क्यांनी वाढ झली आहे. व्यापार तुटीने गेल्या 30 महिन्यांत पहिल्यांदाच इतकी मोठी घट दर्शवली असल्याचे वाणिज्य सचिव एस. आर. राव यांनी सांगितले.


वस्त्र, औषधे आणि कृषी उत्पादनांनी चांगली निर्यातवृद्धी दर्शवली असली, तरी सोने आणि कच्च्या तेलाची आवक कमी झाल्यामुळे आयात खाली घसरली आहे. सोने आणि चांदीची आयात जवळपास 80 टक्क्यांनी कमी होऊन ती अगोदरच्या वर्षातल्या सप्टेंबरमधील 4.6 अब्ज डॉलरवरून यंदा 0.8 अब्ज डॉलरवर आली आहे. तेल आयातीमध्ये 6 टक्क्यांनी घट होऊन ती 13.19 अब्ज डॉलरवर आली आहे.


जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंच्या आयातीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत; परंतु रुपया अधिक सशक्त करण्यासाठी या उपाययोजना कायम चालू ठेवणे गरजेचे असल्याकडे राव यांनी लक्ष वेधले. देशाच्या एकूण निर्यातीमध्ये मोलाचा वाटा असलेल्या अभियांत्रिकी निर्यातीनेदेखील सकारात्मक वाढ नोंदवली आहे. सप्टेंबर महिन्यात अभियांत्रिकी निर्यात 15.2 टक्क्यांनी वाढून 5.2 अब्ज डॉलरवर गेली आहे. ही निर्यात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 0.62 टक्क्यांनी घसरून 28.07 अब्ज डॉलरवर आली आहे.
हिरे,दागिने निर्यात सप्टेंबरमध्ये 8.31 टक्क्यांनी घसरून ती 3.79 अब्ज डॉलरवर आली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ही निर्यात 8.7 टक्क्यांनी कमी होऊन 20 अब्ज डॉलरवर आली आहे. चहा, कॉफी निर्यातीतदेखील घसरण झाली आहे.


तूट नियंत्रणासाठी मदत
व्यापार तूट यंदाच्या वर्षात 150 अब्ज डॉलरच्या खाली जाण्याची शक्यता असून त्यामुळे सरकारला चालू खात्यातील तूट 70 अब्जावर रोखण्यास मदत होईल. यंदाच्या वर्षात निर्यात 350 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. रफीक अहमद, अध्यक्ष फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट


दोन वर्षांनतर जुळले समीकरण
० या अगोदर मार्च 2011 मध्ये व्यापार तूट सर्वांत कमी म्हणजे 3.8 अब्ज डॉलर होती. ऑ गस्टमध्ये ही पोकळी 10.9 अब्ज डॉलर्सने वाढली. सप्टेंबर महिन्यात निर्यात आणि आयात अनुक्रमे 27.8 अब्ज आणि 34.4 अब्ज डॉलर्स झाली आहे.
० यंदाच्या आर्थिक वर्षातल्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत निर्यात 5.14 टक्क्यांनी वाढून 152.1 अब्ज डॉलरवर गेली, तर आयात याच कालावधीत 1.8 अब्ज डॉलरने घसरून 232.23 अब्ज डॉलरवर आली आहे. परिणामी, व्यापार तुटीची सहा महिन्यांच्या कालावधीत 80.1 अब्ज डॉलर नोंद झाली आहे.


चांगले संकेत
चांगला पाऊस, उत्पादन क्षेत्रातील सकारात्मक वातावरण आणि अमेरिकेतील अर्थव्यवस्थेला मिळत असलेली संजिवनी लक्षात घेता यंदाच्या वर्षात निर्यात कामगिरी चांगली होण्याचे संकेत आहेत. ए सक्थीवेल, अध्यक्ष, अ‍ॅपेरल एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल.


सोने आयातीची चिंता
सोने आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या आयातीमुळे व्यापार तूट फुगण्यात भर पडून चालू खात्यातील तूट 2012-13 या वर्षात जीडीपीच्या तुलनेत 4.8 टक्क्यांच्या कमाल पातळीवर किंवा 88.2 अब्ज डॉलरवर गेली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सोने आणि चांदीची आयात 8.7 टक्क्यांनी वाढून ती 23.1 अब्ज डॉलरवर गेली आहे.