आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा फॉर्ममध्ये भरा अचूक माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक जणांना विम्याचा फॉर्म किंवा अर्ज भरणे हे डोकेदुखीचे काम वाटते. ते स्वत: असा फॉर्म भरणे टाळतात. अशा टाळाटाळीमुळे क्लेमच्या वेळी अनेक अडचणी निर्माण होतात. फॉर्ममधील माहितीकडे पाहण्याचा विमा कंपनीचा दृष्टिकोन कसा असतो आणि त्यामुळे कसा फरक पडतो याविषयी...
व्यक्तिगत माहिती : यामुळे विमा करार कोणाबरोबर आहे हे कळते. त्याचबरोबर आपला ग्राहक ओळखा (केवायसी) या नियमाचे पालनही होते. आयुर्विम्याच्या बाबतीत प्रस्तावक (प्रपोझर) आणि विमाधारक वेगवेगळ्या व्यक्ती असू शकतात. जेव्हा आपण स्वत:करिता पॉलिसी घेतो तेव्हा प्रपोझर आणि विमाधारक स्वत: असतो. जेव्हा पती-पत्नी किंवा जीवनसाथीसाठी पॉलिसी घेतो तेव्हा पहिला प्रपोझर बनतो, तर दुसरी व्यक्ती विमाधारक बनते. विमा कराराच्या वेळी त्यांच्यातील नेमके नाते स्पष्ट होते.


शैक्षणिक माहिती : शिकलेल्या व्यक्तींचे उत्पन्न ब-यापैकी असते. त्यांची जीवनशैली उत्तम असू शकते. त्यामुळेच फॉर्ममधील शिक्षणाचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. काही कंपन्यांनी शिक्षणाप्रमाणे विमा मर्यादा निश्चित केल्या आहेत.
कामाचे स्वरूप : आयुर्विम्यात विमाधारकाच्या कामाच्या स्वरूपाला खूप महत्त्व आहे. एखाद्याच्या कामाचे स्वरूप धाकोदायक असेल, त्या कामात जिवाला धोका असेल तर विमा कंपन्या अशा स्थितीत जास्त प्रीमियम आकारतात.
उत्पन्नाची माहिती : एखाद्याचे उत्पन्न किती आहे त्यावरून त्याने किती रकमेपर्यंतचा विमा उतरवावा हे ठरत असते. उत्पन्नानुसारच त्या प्रमाणात विमा संरक्षण मिळते. उदाहरणार्थ, 20 ते 30 वयोगटातील व्यक्ती त्याच्या उत्पन्नाच्या 22 पट विमा संरक्षण मिळवू शकते, तर 40 ते 50 वयागटातील व्यक्ती त्याच्या उत्पन्नाच्या 12 पट विमा संरक्षण घेऊ शकते.


कौटुंबिक माहिती : यात आई-वडील, पत्नी, पती, मुले, भाऊ, बहिणी यांच्याबाबत माहिती द्यायची असते. यामागे दोन उद्देश आहेत. पहिला- काही वाद उद्भवल्यास क्लेमचे संभावित दावेदार कोण असेल आणि दुसरा विमाधारक दीर्घायू आहे की नाही आणि कुटुंबात मृत्यूचे कारण आनुवंशिक आहे की नाही हे कळते.


आरोग्य व जीवनशैली : विम्याच्या पॉर्ममधील हा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. यात आरोग्य तसेच वैद्यकीय हिस्ट्रीबाबत माहिती द्यावी लागते. सिगारेट, दारू पिण्याचे व्यसन आहे का याचा उल्लेख करावा लागतो. धूम्रपान करणा-या, मधुमेह असणा-या तसेच जास्त वजन असणा-या व्यक्तींकडून जास्त प्रीमियम आकारला जातो.
मागील विमा पॉलिसींची माहिती : एकूण विमा संरक्षणासाठी विमा कंपन्यांनी याची गरज भासते. जर एखाद्याने आधीच भरपूर विमा पॉलिसी घेतल्या असतील व त्याद्वारे त्याची विमा संरक्षणाची मर्यादा संपली असेल तर नव्याने विमा संरक्षण मिळत नाही.


नॉमिनेशन : विमाधारकाच्या मृत्यूनंतर क्लेमची रक्कम कोणाला द्यायची याबाबत नामनिर्देशन (नॉमिनी) करावे लागते. त्याची माहिती नॉमिनेशन सदरात भरावी.
लक्षात ठेवण्याच्या इतर बाबी : पत्नी तसेच मुलांसाठी घेण्यात येणा-या पॉलिसींसाठी महत्त्वाच्या तरतुदी आहेत. अशा पॉलिसी मॅरिड वुमेन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) कायद्याद्वारे घेता येतात. याकरिता पॉलिसी घेण्यासाठीच्या अर्जावर स्वाक्षरी करावी लागते. नंतर त्यात बदल करता येत नाही. एमडब्लयूपीअंतर्गत घेण्यात आलेल्या पॉलिसी कोर्टातही सादर करता येत नाहीत. तसेच मृत व्यक्तीच्या देण्यात या पॉलिसी ग्राह्य धरता येत नाहीत.
लेखिका प्रमाणित वित्तीय नियोजक आणि द फायनान्शियल प्लॅनर्स गिल्ड इंडियाचे सदस्य आहेत.