आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Health Insurance Holder Get Surger Processer Coveage Profit

आरोग्य विमाधारकांना प्रिमियम मध्‍ये मिळणार सर्जरी प्रोसिजर च्या संरक्षणाचा लाभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विमा क्षेत्रातील सरकारी कंपन्यांनी आपल्या प्रेफर्ड प्रोव्हायडर्स नेटवर्क (पीपीएन) अंतर्गत सर्जरी प्रोसिजरची संख्या वाढवून 100 करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरोग्य विमाधारकांना सध्याच्या प्रीमियममध्येच जास्त सर्जरी प्रोसिजरच्या संरक्षणाचा लाभ घेता येईल. सध्या सरकारी विमा कंपन्या पीपीएनअंतर्गत 42 सर्जरी प्रोसिजरचे संरक्षण देतात.

चारही सरकारी विमा कंपन्यांच्या पीपीएनसाठी नोडल एजन्सी म्हणून काम करणा-या थर्ड पार्टी अ‍ॅडमिनिस्टर्स (टीपीए) रक्षा टीपीएचे मुख्य व्यवस्थापक पवन भल्ला यांनी सांगितले, सर्जरी प्रोसिजरची संख्या 42 वरून 100 करण्याबाबत रुग्णालयांशी चर्चा सुरू आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत नवी सुविधा लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे आरोग्य विमाधारकांना सध्याच्या प्रीमियममध्येच अधिकाधिक सर्जरी प्रोसिजरचा लाभ घेता येईल. भल्ला यांनी उदाहरण सांगितले. ते म्हणाले, सध्या हृदयविकारासाठी तीन प्रोसिजर, जसे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि सीएजीबीला संरक्षण मिळते. जर एखाद्याने पेसमेकर लावले किंवा बॅलूनिंग केले तर त्यासाठी त्याला स्वत:च्या खिशातून पैसे द्यावे लागतात. आता हृदयविकारासंबंधी शस्त्रक्रियेत पेसमेकर तसेच बॅलूनिंगचाही समावेश होऊ शकतो. याचप्रमाणे इतर अनेक आजारांसंबंधीचे प्रोसिजरबाबतचे स्वरूप अधिक स्पष्ट होईल. प्रोसिजरमध्ये स्पष्टता आल्यास ग्राहकाला मर्यादा कळतील. त्यामुळे त्याला आपल्या ऐपतीनुसार रुग्णालयाची निवड करण्याचा पर्याय मिळेल. त्यामुळे त्याच्यावर अतिरिक्त पैसे खर्च करण्याची वेळ येणार नाही. शस्त्रक्रियांच्या नवनव्या तंत्रावर आधारित पद्धती येत आहेत. त्यांचे शुल्क वेगवेगळे असते. अशा स्थितीत आपल्या कुवतीनुसार व सोयीनुसार ग्राहकाला तंत्राची निवड करता येईल.

सर्जरी प्रोसिजर परिभाषित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांचा आधार घेण्यात येतो. पीपीएनच्या आरोग्य विमातील उलाढाल घटल्याने सरकारी विमा कंपन्या आता छोट्या शहरांतही सेवा विस्तारण्याच्या विचारात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या काही महिन्यांत जयपूर, इंदूर आणि कोइम्बतूर येथे पीपीएन कार्यरत होईल. याबरोबरच कंपन्या पंचतारांकित हॉस्पिटल शृंखलेला आपल्यासमवेत जोडत आहेत. नुकतेच अपोलोला पीपीएनमध्ये समाविष्ट झाले आहे. इतर पंचतारांकित हॉस्पिटल पूर्वीपासूनच पीपीएनमध्ये आहेत. पीपीएनमध्ये समावेश असलेल्या रुग्णालयाचे शस्त्रक्रिया शुल्क 25 ते 30 टक्के कमी करण्यात सरकारी विमा कंपन्या यशस्वी ठरल्या आहेत.