आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य विमा : आरोग्याचे नव्हे, बचतीचे संरक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य विमा खरोखरच आपल्या आरोग्याचे रक्षण करतो का, असा प्रश्न स्वत:ला विचारा. त्याचे उत्तर नकारार्थी येईल. अशी कोणतीच पॉलिसी नाही जी आपल्या आरोग्याचे रक्षण करू शकते. संतुलित आहार, योग्य जीवनशैली, व्यायाम आणि काळजी यामुळेच निरोगी राहता येते. मग आता प्रश्न असा आहे की, हेल्थ किंवा मेडिक्लेम विमा जर आपल्या आरोग्य संरक्षण करण्यास सक्षम नाही तर त्याचा फायदा काय? आरोग्य विम्यामुळे खरे तर आपल्या बचतीचे रक्षण होत असते हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, परंतु हे शंभर टक्के खरे आहे.

अचानक उद्भवणार्‍या आपत्कालीन आर्थिक परिस्थितीत तगून जाण्यासाठी आरोग्य विम्यातील बचत उपयोगी पडत असते. त्यामुळेच आरोग्य विमा खरेदीबरोबरच आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

वित्तीय नियोजनात केवळ पैसे जमा करणे किंवा मिळवणे एवढाच हेतू नसतो तर पैशांचा ओघ कधीच थांबणार नाही याकडेही लक्ष द्यावे लागत., त्यासाठी आरोग्य विम्याची शिफारस केली जाते. जगात अनेक जणांनी भरपूर कमाई केली आहे, मात्र त्याबरोबरच आपल्या आरोग्याची हेळसांड केल्याचे दिसून येते. पैसे जमवणे व कमावण्याच्या नादात या लोकांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे उतारवयात त्यांना अनेक आजार जडले. मात्र, जवळ भरपूर पैसे असतानाही ज्याप्रमाणे त्यांनी पैसे गुंतवताना स्वप्ने पाहिली होती, त्याप्रमाणे हा पैसा त्यांना मुक्तपणे खर्च करता येत नाही. येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की, कितीही आरोग्य विमा संरक्षण घेतले तरी आपण निरोगी राहणे व नियमित व्यायाम करणे हेच खरे संरक्षण आहे. यासाठी संतुलित आहार, शिस्त आणि संयम याची गरज आहे. निरोगी राहून तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगू शकता. आपला प्रत्येक क्षण उत्साह, विश्वास आणि मानसिक शांती असलेला हवा. मोठी रक्कम खर्च करूनही आपण हे मिळवू शकत नाही, हे पक्के लक्षात ठेवा.

चाकरमानी आपल्या कार्यालयाच्या कँटीनमधील मिठाई आणि जंक फूडवर यथेच्छ ताव मारताना दिसतात. खाताना हे अत्यंत चांगले वाटते, मात्र नंतर त्याचे दुष्परिणाम अनेक आजारांतून दिसून येतात. अशा सवयींवर नियंत्रण ठेवायला हवे.
रुपया किंवा पैसे ही मानवाची निर्मिती आहे. निसर्गात उपलब्ध असलेल्या साधनांचा आनंद लुटण्यासाठीचे ते एक माध्यम आहे. आपण सर्व शक्ती आणि उत्साह केवळ पैसे कमावण्यासाठी खर्च केला तर इतर बाबींचा आनंद उपभोगता येणार नाही. त्यामुळे काही वेळ आरोग्यासाठी देणे महत्त्वाचे आहे. आरोग्यासाठी दररोज किमान एक तास वेळ राखून ठेवणे गरजेचे आहे. त्यात व्यायाम, सकाळी किंवा सायंकाळी पायी फिरणे, योग्य प्रमाणात जेवण व नियमित देखभाल यांचा समावेश असावा. एवढे जरी नियमित केले तरी आपल्याकडे पैसे कमी असले तरी इतरांच्या तुलनेत तुमची स्थिती निश्चितच चांगली राहील.

आरोग्य विमा आपल्या आरोग्याच्या नव्हे तर बचतीच्या संरक्षणासाठी आहे. त्यामुळेच तर म्हणतात हेल्थ इज वेल्थ.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.