आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Health Insurance News In Marathi, Patients, Unique Number, Divya Marathi

आरोग्य विमा होणार पारदर्शक, देशभरातील रूग्णालयांसाठी आता युनिक ओळख क्रमांक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए-इर्डा) रुग्णालयांसाठी विशिष्ट ओळख क्रमांक जाहीर केले आहेत. सर्व विमा कंपन्या आणि थर्ड पार्टी अ‍ॅडमिनिस्टर्स (टीपीए) यांनी सर्व रुग्णालयांचे विशिष्ट क्रमांक आयटी प्रणालीशी जोडण्याचे निर्देश इर्डाने दिले आहेत. साधारण विमा क्षेत्रातील सर्व कंपन्या आणि आयुर्विमा कंपन्यांच्या प्रमुखांसाठी इर्डाने एक परिपत्रक जारी केले आहे. दहा थर्ड पार्टी अ‍ॅडमिनिस्टर्स, 13 आयुर्विमा कंपन्या आणि 18 साधारण विमा कंपन्यांकडून आलेल्या मतांच्या आधारे युनिक हॉस्पिटल आयडी क्रमांक व्हर्जन 1.0 जारी केला असल्याचे इर्डाने म्हटले आहे. याद्वारे 29,292 रुग्णालयांना युनिक आयडी क्रमांक मिळाला आहे.


इर्डाच्या मते, सर्व विमा कंपन्या आणि टीपीएद्वारे रुग्णालयांचे युनिक आयडी क्रमांक स्वीकारल्यामुळे एखाद्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील कल, आजारांचे प्रमाण आणि आजारावरील उपचारांवर येणा-या खर्चाशी निगडित आकडेवारीचे विश्लेषण करणे शक्य होणार आहे.


खासगी क्षेत्रातील एका विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले, युनिक आयडी क्रमांकामुळे सर्व विमा कंपन्या त्या संबंधित रुग्णालयाच्या युनिक आयडी क्रमांकाचा वापर करतील. यामुळे विमा कंपन्यांना आजार आणि त्यासाठी लागणा-या खर्चाचे आकडे जमा करण्यात सुलभता होईल. या पद्धतीमुळे रुग्णालयांनाही शुल्क व किमतीबाबत पारदर्शक पद्धतीचा अवलंब करावा लागेल. सध्या रुग्णालयाच्या किमतींबाबत पारदर्शक पद्धत नाही. विविध वैद्यकीय चाचण्यांसाठी तसेच तपासणीसाठी लागणा-या शुल्काचे आकडे जमा करण्यासाठी रुग्णालयांना देण्यात आलेले क्रमांक उपयुक्त ठरणार आहेत.


इर्डाचे अध्यक्ष टी.एस. विजयन यांनीही अशाच स्वरूपाचे मत व्यक्त केले होते. युनिक आयडी क्रमांक जारी झाल्यानंतर एक रुग्णालय समान वैद्यकीय उपचारांसाठी दुस-या रुग्णालयाच्या तुलनेत किती जास्त किंवा कमी शुल्क आकारते ते लक्षात येईल. आरोग्य विमा क्षेत्रात आकडेवारीअभावी रुग्णालये विमा संरक्षणार्थ रुग्णांकडून जास्त रकमेची वसुली करतात. 13 आयुर्विमा कंपन्या आणि 18 साधारण विमा कंपन्यांकडून यासाठी इर्डाने मते मागवली होती.


नेमके काय होणार
प्रत्येक रुग्णालयाला युनिक आयडी क्रमांक मिळणार. सर्व विमा कंपन्या आणि टीपीएला हा क्रमांक आयटी प्रणालीत जोडून घ्यावा व त्यानुसार बदल करावेत असे इर्डाचे निर्देश
० इर्डाने युनिक आयडी हॉस्पिटल आयडी क्रमांकाचे व्हर्जन 1.0 जारी केले आहे. ज्यात 29,292 रुग्णालयांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात आले आहेत.
० एखाद्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील कल, आजारांचे प्रमाण आणि आजारावरील उपचारांवर येणा-या खर्चाशी निगडित आकडेवारीचे विश्लेषण करणे शक्य होणार आहे.
० युनिक आयडी क्रमांकामुळे आरोग्य विमा क्षेत्रात पारदर्शकता येईल असे विमा कंपन्यांना वाटते. यामुळे वैद्यकीय उपचार व पद्धतीच्या शुल्क आकारणीतील अवाजवीपणा कमी होईल व फसवणुकीच्या प्रकारावर नियंत्रण येईल. सध्या रुग्णालयानुसार शुल्क कमी जास्त होते.