आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी लग्नतिथी, अवकाळी पावसाने सोन्याला ओहोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंदाच्या एप्रिल ते जून तिमाहीत झालेला अवकाळी पाऊस, त्यामुळे झालेले पिकांचे नुकसान आणि कमी लग्नतिथींमुळे देशातील सोन्याची मागणी २५ टक्क्यांनी घटली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या ताज्या अहवालात ही निरीक्षणे नोंदण्यात आली आहेत. या तिमाहीत देशात १५४.५ टन सोने आले.

या संदर्भात जागतिक सुवर्ण परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक पी.आर. सोमासुंदरम यांनी सांगितले, एप्रिल ते जून या तिमाहीत शेअर बाजारात चांगली तेजी होती, तर याच काळात झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे ग्रामीण अर्थचक्र बिघडले. या तिमाहीत कमी शुभमुहूर्त होते. तसेच लग्नतिथी कमी होत्या. या सर्वांचा परिणाम सोन्याची मागणी घटण्यात झाला. त्यामुळे एप्रिल ते जून या काळात देशातील सोन्याची मागणी २५ टक्क्यांनी घटून १५४ टनांवर आली.

सध्याची तेजी तात्पुरती
चलनांच्या अवमूल्यनामुळे सध्या सोने तेजीत आहे. मात्र ही तेजी तात्पुरती असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. चीनने युआनचे अवमूल्यन घडवून आणल्याने डॉलर वधारला आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने तेजीत आले आहे. भारतीय बाजारात सध्या सोने तेजीत आहे.
छोट्या शहरांत जास्त परिणाम
अहवालानुसार, देशातील द्वित्तीय व तृत्तीय श्रेणी शहरातील किरकोळ सराफा पेढ्यांवर सोन्याची मागणी घटल्याचा जास्त परिणाम दिसून आला. अक्षय्य तृतीयेसारख्या सणावारांच्या तिथी वगळता सोन्याला जास्त मागणी नव्हती. तिथींच्या दिवशीही अपुऱ्या मान्सूनच्या शक्यतेने ग्राहकांनी सावध पवित्र्याने खरेदी केली.

म्युच्युअल फंडांना सुगीचे दिवस
तिकडे सोन्याच्या झळाळीला ओहोटी लागली असतानाच म्युच्युअल फंडांना मात्र सुगीचे दिवस असल्याचे चित्र आहे. यंदाच्या जानेवारी ते एप्रिल या काळात इक्विटी म्युच्युअल फंडांत ११ लाख नवे गुंतवणूकदार आले आहेत, तर २०१४-१५ या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडांत २५ लाख नव्या खात्यांची भर पडली आहे.