नवी दिल्ली - सरकारी विमा कंपन्यांचा आरोग्य विमा महागल्यानंतर आता खासगी विमा कंपन्यांनी ग्राहकांना झटका देण्याची तयारी केली आहे. खासगी क्षेत्रातील साधारण विमा कंपनी आयसीआयसीआय लोम्बार्डने वार्षिक 15 ते 18 टक्के वैद्यकीय महागाईचा हवाला देत विमा पॉलिसीच्या प्रीमियममध्ये 20 टक्के वाढ केली आहे, तर बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स आणि भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्सने प्रीमियम वाढवण्याबाबत विचार सुरू केला आहे.
आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सचे प्रमुख (अंडररायटिंग व क्लेम) संजय दत्ता यांनी सांगितले, मागील सहा वर्षांत कंपनीने सिंगल विमा पॉलिसीच्या प्रीमियममध्ये वाढ केलेली नाही. मात्र, वैद्यकीय महागाई (मेडिकल इन्फेल्शन) वाढल्याने विविध वयोगटांसाठीच्या प्रीमियममध्ये 10 ते 20 टक्के वाढ केली आहे. प्रीमियम वाढवताना क्लेम एक्स्पिरिअन्स आणि उत्पादनांची कामगिरी याच्याशी निगडित घटकांकडे लक्ष देण्यात आले आहे. खासगी क्षेत्रातील आणखी एक साधारण विमा कंपनी बजाज अलियांझ बाजारात असणा-या आपल्या उत्पादनांच्या कामगिरीच्या आधारे प्रीमियमवाढीबाबत आढावा घेत आहे. बजाज अलियांझचे प्रमुख (आरोग्य विमा) सुरेश सुगाथन यांच्या मते, एखादे आरोग्य विमाविषयक उत्पादन क्लेमच्या खर्चाच्या आघाडीवर खराब कामगिरी करत असेल, तर त्याचा आढावा घेणे आवश्यक असते. विमा नियामकानुसार दर तीन वर्षांनी असा आढावा घ्यावा लागतो. त्यामुळे कंपनी आता आढावा घेणार आहे. कंपनीने काही नवीन आरोग्य विमा पॉलिसी बाजारात आणण्याचे ठरवले आहे. त्यातील वैशिष्ट्यांनुसार त्याचा प्रीमियम कमी-जास्त राहील. यात काही चांगली व विविध वैशिष्ट्ये असणारी उत्पादने आहेत, त्यांचा प्रीमियम जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच नव्या पॉलिसीत काही पॉलिसी मास प्रॉडक्ट असतील. त्यांचा प्रीमियम कमी राहील, कारण त्यांचे फीचर्स कमी असतील. सध्याच्या पॉलिसीपेक्षा वेगळ्या पॉलिसी कंपनीकडे असल्याचे यामुळे सांगता येईल. ग्राहकांनाही त्यांच्या सोयीनुसार कमी खर्चाच्या किंवा जास्त फीचर्सच्या पॉलिसींची निवड करता येईल.
विमा नियामकाच्या आकडेवारीनुसार मेडिकल इन्फेल्शन वार्षिक 15 ते 18 टक्के दराने वाढते आहे. त्यामुळे खर्च आणि प्रीमियमचे योग्य संतुलन राखणे आवश्यक असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्सचे व्यस्थापकीय संचालक व सीईओ डॉ. अमरनाथ अनंतनारायण यांच्या मते, सिंगल आरोग्य विमा प्रकारात कंपनीने 15 ते 20 टक्के प्रीमियम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारी आरोग्य विमा 20 ते 40 टक्के महागला
गेल्या वर्षी सरकारी साधारण विमा कंपन्यांनी आरोग्य विमा प्रीमियममध्ये 20 ते 40 टक्के वाढ केली होती. ही वाढ करताना मागील पाच ते सहा वर्षे प्रीमियममध्ये वाढ न केल्याचा हवाला दिला होता.
15 ते 20 टक्क्यांपर्यंत सिंगल विमा पॉलिसी प्रीमियममध्ये वाढ करण्याचा भारती अॅक्सा कंपनीचा विचार आहे.
20 टक्के वाढ आयसीआयसीआय लोम्बार्डने सिंगल विमा पॉलिसी प्रीमियममध्ये केली आहे.